Join us  

राणीची बाग बघता येणार एका क्लिकवर, सोशल मीडियावर वेबपेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 8:16 AM

Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo : महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या सोशल मीडिया पेजचे लोकार्पण राणी बागेतील थ्रीडी थिएटरमध्ये करण्यात आले.

मुंबई : देश-विदेशातील पर्यटक व मुंबईकरांचे विशेष आकर्षण ठरणारे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीची बाग आता सोशल मीडियावर पोहोचली आहे. एका खासगी संस्थेच्या सहकार्याने राणी बागेची सखोल माहिती देण्यासाठी ‘द मुंबई झू’ (फेसबुक, यूट्युब, ट्विटर आणि इंस्टाग्राम) हे सोशल मीडिया पेज मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे.  महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या सोशल मीडिया पेजचे लोकार्पण राणी बागेतील थ्रीडी थिएटरमध्ये करण्यात आले. राणी बागेचे अधिकृत सोशल मीडिया पेज म्हणजे मुंबईसाठी मानाचा आणखी एक तुरा असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.  प्राणिसंग्रहालयातील दुर्मीळ वनस्पती तसेच प्रजातींचे वैज्ञानिक व आध्यात्मिक महत्त्व या दोन्ही बाबींचा उल्लेख आपल्या सोशल मीडिया पेजवर घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी प्राण्यांना कशाप्रकारे संभाळतात, त्यांची प्राण्यांसोबत बोलण्याची भाषा, हातवारे या संपूर्ण बाबींचे चित्रीकरण करून याचे व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया पेजवर घेण्याचा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मुंबईतील प्राणिसंग्रहालयात इतर देश व राज्यातील प्राणी लवकरच आणण्यात येणार आहेत. याबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. तसेच राणी बागेशी संबंधित माहितीबाबत विद्यार्थ्यांच्या काही शंका असल्यास त्यांचे शैक्षणिकदृष्ट्या काही शंकानिरसन करणे, येथील प्राणी, पक्षी, हेरिटेज वास्तू, आदींची माहिती देण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबईराणी बगीचा