Join us  

सेलिब्रिटींसोबत 'वस्त्रहरण'चा ५२५५ प्रयोग, ४४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रंगभूमीवर होणार ४४ प्रयोग

By संजय घावरे | Published: February 16, 2024 5:26 PM

Vastraharan: मच्छिंद्र कांबळी यांचे मराठी रंगभूमीवर विक्रमी नाटक 'वस्त्रहरण' पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ४४ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत या नाटकाचा सेलिब्रिटींच्या संचातील ५२५५ वा प्रयोग लवकरच सादर केला जाणार आहे. 

मुंबई - मच्छिंद्र कांबळी यांचे मराठी रंगभूमीवर विक्रमी नाटक 'वस्त्रहरण' पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ४४ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत या नाटकाचा सेलिब्रिटींच्या संचातील ५२५५ वा प्रयोग लवकरच सादर केला जाणार आहे. 

मराठी माणूस आणि नाटकाचे एक अजब नाते आहे. कोकणातील दशावतारी नाट्यकलेसोबतच शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे, नमन या लोककलांनी नेहमीच रसिकांचे मनोरंजन केले आहे. याच परंपरेतील मालवणी नाटक रंगभूमीवर आणून ते कोकणापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण जगभर पोहोचवण्याचे काम मच्छिंद्र कांबळी आणि त्यांच्या टिमने केले आहे. या नाटकाच्या निमित्ताने कांबळी यांनी मालवणी भाषाच सर्वदूर पोहोचवण्याचे काम केले. कांबळींच्या पश्चातही ठराविक अंतराने हे नाटक विविध कलाकारांच्या संचात रंगभूमीवर अवतरले आहे. १६ फेब्रुवारी १९८० रोजी कांबळी'नी 'वस्त्रहरण'चा पहिला प्रयोग केला. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेल्या 'वस्त्रहरण' या अजरामर कलाकृतीला १६ फेब्रुवारीला ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स सेलिब्रिटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर करणार असून लवकरच ५२५५ वा प्रयोग सादर होणार आहे. या नाटकात कोणकोणते कलाकार कोणकोणत्या व्यक्तिरेखांमध्ये दिसणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यावरून लवकरच पडदा उठणार असून, नव्या संचातील 'वस्त्रहरण'ची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते. 

टॅग्स :मराठी