Join us  

अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचे २ ऑगस्टपासून लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:07 AM

मुंबई : अंथरुणाला खिळून असणाऱ्या राज्यभरातील रुग्णांना व वयोवृद्ध नागरिकांना कोरोना लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिली ...

मुंबई : अंथरुणाला खिळून असणाऱ्या राज्यभरातील रुग्णांना व वयोवृद्ध नागरिकांना कोरोना लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत पालिकेकडे या लसीकरणासाठी ४ हजार ४८८ व्यक्तींनी नोंदणी केली आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी याविषयी सांगितले, या व्यक्तींच्या लसीकरणासाठी आरोग्य पथकांच्या माध्यमातून तपासणी सुरु करण्यात आली आहे. या लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रियाही सुरु आहे. नोंदणी केलेल्या व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहेत का हे पाहण्यात येणार आहे. लसीकरणासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक असून त्यानंतर कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे.

अंथरुणाला खिळून असलेले रुग्ण व वयोवृद्धांना घरी जाऊन आरोग्य पथकाने लस द्यावी, यासाठी उच्च न्यायालय आग्रही होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या व्यक्ती अंथरुणाला खिळून आहेत व पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल, अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे. अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि ही व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती covidvaccsbedridden@gmail.com यावर पाठविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस ५१४९५०४

दुसरा डोस १५७५९३८

६० पेक्षा जास्त वयोगट

पहिला डोस ९८२४१३

दुसरा डोस २८३६७७

लसीच्या प्रतीक्षेत

घरातील सदस्य गेली २ वर्षे अंथरुणाला खिळून आहे, वैद्यकीय स्थितीमुळे लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे शक्य नाही. त्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न केले; मात्र निराशा आली. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय सकारात्मक आहे. आता आशा आहे, की लवकरच लसीकरण पूर्ण होईल.

- रामकृष्ण कानविंदे, परळ

नोंदणी पूर्ण

लसीकरणासाठी घरातील एका सदस्याची नोंदणी केली आहे. पालिकेकडून आता लसीकरणासाठी पात्रता तपासण्यात येईल, कोविड संसर्गाच्या धोक्यामुळे शिवाय, घरातून ७८ वर्षीय पतीला बाहेर घेऊन जाणे शक्य नसल्याने लसीकरणापासून वंचित राहावे लागले. आता लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे वाटते.

- जयश्री सोनटक्के, माझगाव