Join us  

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रसिद्ध आणि पद्म पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे रविवारी निधन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रसिद्ध आणि पद्म पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गुलाम मुस्तफा यांची सून नम्रता हिने सोशल मीडियावर ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

या संदेशात त्यांनी ‘काही मिनिटांपूर्वीच माझे सासरे, आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ आणि देशातील ज्येष्ठ, पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी अखेरचा श्वास घेतला’, असे नमूद केले आहे. सोनू निगमने नुकताच उस्ताद गुलाम खान यांच्यासारखे गातानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता.

भारतीय शास्त्रीय संगीतातील रामपूर सहसवान घराण्याशी संबंध असलेले उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनावर लता मंगेशकर, एआर रहमान यांच्यासारख्या दिग्गजांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना १९९१ मध्ये पद्मश्री, २००६ मध्ये पद्मभूषण आणि २०१८ मध्ये पद्मविभूषणसारख्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. मुस्तफा खान यांचा जन्म ३ मार्च, १९३२ साली उत्तर प्रदेशातील बदायूं येथे झाला होता. उस्ताद गुलाम मुस्तफा शिष्यांच्या यादीत सोनू निगमसोबतच हरिहरन, शान, आशा भोसले, गीता दत्त, मन्ना डे, एआर रहमान आणि लता मंगेशकर यांच्या नावांचा समावेश आहे.

----

पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी आपल्या बहुविध योगदानामुळे भारतीय शास्त्रीय संगीत विश्व समृद्ध केले. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी उत्तमोत्तम शिष्यांच्या पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनामुळे एक महान शास्त्रीय संगीतकार व तितक्याच थोर व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहो. दिवंगत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय, चाहते तसेच शिष्यांना कळवितो, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.