Join us  

‘फेविक्विक’ वापरून ते करायचे एटीएममधून पैसे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:19 AM

एटीएमममधून चोरी करण्यासाठी ‘स्कीमर’चा वापर केला जात असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले होते. मात्र, आता ‘फेविक्विक’ वापरत एटीएमची बटन्स चिकटवून त्यातून पैसे काढण्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे.

गौरी टेंबकर-कलगुटकर मुंबई : एटीएमममधून चोरी करण्यासाठी ‘स्कीमर’चा वापर केला जात असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले होते. मात्र, आता ‘फेविक्विक’ वापरत एटीएमची बटन्स चिकटवून त्यातून पैसे काढण्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे. मुख्य म्हणजे, ही शक्कलल वापरून चोरी करणारे दोन विद्यार्थी असून, ते एव्हीएशनमध्ये ‘केबिन क्रू’चे शिक्षण घेत आहेत. डी. एन. नगर पोलिसांनी कुर्ला परिसरातून या दोघांनाही अटक केली आहे.साहिल शेख (वय १९) आणि स्वरूप खामकर (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कुर्ला परिसरात राहणाºया या दोघांचीही आर्थिक परिस्थिती सामान्य आहे. नुकतेच त्यांनी एव्हिएशनच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. ते ‘केबिन क्रू’ मेंबरचे प्रशिक्षण घेत आहेत.गेल्या काही महिन्यांत एटीएममधून पैसे चोरीला जाण्याचे प्रकार मुंबईत वाढले आहेत. यात एटीएम ‘स्कीमर’चा वापर होत असल्याची माहिती पोलिसांकडे होती. मात्र, अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात जेव्हा अशा दोन ते तीन तक्रारी सलग पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानंतर, डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्रीनिवास चेवले आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी तपास सुरू केला.तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी ठरावीक एटीएमवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. यात एका एटीएममध्ये दोन तरुण जवळपास १५ मिनिटे संशयास्पदरीत्या रेंगाळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज चेवले यांनी पडताळून पाहिले. त्यात शेख आणि खामकर यांचा चेहरा दिसला.त्यानंतर, तांत्रिक तपास आणि कॉल लोकेशननुसार त्यांनी या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. सुरुवातीला काहीही सांगण्यास तयार नसणाºया या विद्यार्थ्यांनी, पोलिसांनी केलेल्या प्रश्नाच्या भडिमारात गुन्हा कबूल केला. एटीएममधून पैसे चोरण्यासाठी त्यांनी जी शक्कल लढवली, ती ऐकून पोलिसांच्यादेखील भुवया उंचावल्या.।अशी करायचे ग्राहकांची फसवणूकफेविक्विक’चा वापर करून ते दोघे एटीएममध्ये चोरी करायचे. ज्या एटीएममधून सुरक्षारक्षक लवकर निघून जातात, अशा एटीएमना त्यांनी ‘टार्गेट’ केले होते. एटीएममध्ये जाऊन त्याच्या ‘की-बोर्ड’वर असलेल्या ‘प्लस’ ‘मायनस’ बटणांच्या खालील लेयरला ‘फेविक्विक’ लावून ते बटन खाली दाबून चिकटवायचे. एखादा ग्राहक पैसे काढण्यासाठी आत गेला की, कार्ड स्वाइप करायचा. मात्र, आधीच एक बटण चिकटवलेले असल्याने की-बोर्डवरील बटण दाबलेच जायचे नाही, त्यामुळे तो नंबरदेखील त्या ग्राहकाला दिसायचा नाही.तेव्हा दोघांमधील एक जण आत येऊन ‘क्या हुवा, कुछ एरर है शायद’, ‘मेरा भी पैसा नही आया’, असे सांगत मदत करत असल्याचे भासवत, ग्राहकाचा पिन क्रमांक जाणून घ्यायचे. थोडे-फार प्रयत्न केल्याचा आव आणत, नंतर एटीएम खराब असल्याचे सांगत ग्राहकाला तिथून घालवून द्यायचे. जसा तो ग्राहक निघून जायचा, तसे हे दोघे ‘प्लस’ ‘मायनस’ बटणवर लावलेला फेविक्विक ब्लेडने काढून टाकायचे. ग्राहकाने कार्ड स्वाइप करून ते कॅन्सल न केल्याने ट्रान्झॅक्शन सुरू असायचे. त्यामुळे पिन क्रमांक टाकून ते पैसे काढायचे आणि पसार व्हायचे. एखादी सुशिक्षित व्यक्ती असेल, तर ती ‘डू यू वॉन्ट टू कॅन्सल धिस ट्रान्झॅक्शन?’ याला ‘येस’ म्हणत ट्रान्झॅक्शन कॅन्सल करायची. मात्र, अधिकाधिक ग्राहक घाईगडबडीत कॅन्सल न करताच निघून जायचे. याचाच फायदा हे दोघे उठवत असल्याचे तपास अधिकाºयांनी सांगितले.>१८ ट्रान्झॅक्शन केल्याची कबुलीअटक करण्यात आलेल्या दुकलीने आत्तापर्यंत १७ ते १८ अशाच प्रकारचे ट्रान्झॅक्शन केल्याचे प्राथमिक चौकशीत कबूल केले आहे. मात्र, आम्ही त्याचे सीडीआर काढून, त्यानुसार त्यांनी असे प्रकार कुठे-कुठे केले आहेत, याची चौकशी करत आहोत.- श्रीनिवास चेवले, पोलीस निरीक्षक,डी. एन. नगर पोलीस ठाणे.

टॅग्स :एटीएम