मुंबई : फरसाण, फ्राइड नुडल्स, नमकीन मूगडाळ, मसालेदार चणाडाळ आणखी चविष्ट बनविण्यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे सामान व रासायनिक रंग वापरण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ मालाड पूर्व व पश्चिम येथील अशा तीन बेकायदा कारखान्यांवर पालिकेने धाड टाकली आहे़ हे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य व कच्चा माल हा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत प्रमाणित नसल्याचे उघडकीस आले आहे़गेल्या महिन्यापासून पालिकेच्या पी उत्तर विभागाने ही कारवाई सुरू केली आहे़ त्यानुसार मालाड पूर्व व पश्चिम येथील जय भीमनगर दिंडोशी, आंबेडकर नगर, अप्पा पाडा, राजनपाडा, मित्तल कॉलेजमागे अशा तीन कारखान्यांमधील हा निकृष्ट माल जप्त करण्यात आला आहे़ गलिच्छ जागा, पामतेल व पिठामध्ये हानिकारक रंगाचा वापर अशा पद्धतीने हे पदार्थ तयार होत असल्याचे या कारवाईदरम्यान दिसून आले़ या कारवाईत पी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन, अतिक्रमण निर्मूलन विभाग, आरोग्य विभागाचा सहभाग होता़फरसाण चविष्ट बनविण्यासाठी निकृष्ट दर्जाचे सामान, कॉस्टिक सोडाचा वापर केला जातो़ तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाची सुकवलेली कैरी व मिरची पूड वापरून फरसाणाची चव वाढविण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाला आढळून आले़ या कारखान्यांतून हलक्या दर्जाचा ३५ गोण्या माल, १५ लीटर तेलाची २२ पिंपे, पाच गोण्या पीठ जप्त करण्यात आले़ या कारखान्यांचे मालक कृष्णा पानसरे, अॅन्थोनी राज आणि छत्रमल परिहर यांच्यावर कारवाई करण्यात आली़ (प्रतिनिधी)
खाद्यपदार्थांमध्ये हानिकारक रंगाचा वापर
By admin | Updated: July 8, 2015 01:00 IST