Urmila defeats blame on Nirupam supporters | ऊर्मिलाने पराभवाचे खापर फोडले निरुपम समर्थकांवर
ऊर्मिलाने पराभवाचे खापर फोडले निरुपम समर्थकांवर

मुंबई : मुंबई काँग्रेसमधील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सामूहिक नेतृत्वाच्या प्रस्तावावरून मिलिंद देवरा विरुद्ध संजय निरुपम या वादात सोमवारी ऊर्मिला मातोंडकरच्या पत्राची भर पडली. स्थानिक नेते, विशेषत: संजय निरुपम यांच्या समर्थकांमुळेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याचा थेट आरोप ऊर्मिलाने पत्राद्वारे केला होता. ऊर्मिलाचे हे नऊ पानी पत्रच सोमवारी व्हायरल झाले.


मिलिंद देवरा यांनी रविवारी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्वाचा प्रस्तावही त्यांनी मांडला. पक्षाला खड्ड्यात नेणारा प्रस्ताव, अशी संभावना करत संजय निरुपम यांनी देवरा यांच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला होता. मुंबई काँग्रेसमधील लाथाळ्यांच्या या नव्या अंकात ऊर्मिलाच्या पत्राची भर पडली.


१६ मे रोजी तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना ऊर्मिलाने हे नऊ पानी पत्र पाठविले होते. व्यक्तिगत हेवेदावे, अहंकारामुळे स्थानिक नेत्यांनी मुद्दामहून काँग्रेसचा प्रचार भरकटवल्याचा आरोप ऊर्मिलाने या पत्रात केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे मुख्य समन्वयक संदेश कोंडविलकर, भूषण पाटील आदी नेत्यांनी काँग्रेसच्या प्रचारात खोडा घातला. या नेत्यांच्या बेशिस्त वर्तन आणि राजकीय शहाणपणाच्या अभावी सतत अनावश्यक वाद निर्माण झाले. परिणामी, तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचल्याचा आरोप ऊर्मिलाने या पत्रात केला होता. पक्षाच्या हितासाठी या नेत्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही ऊर्मिलाने पत्रात केली.


‘देवरांनीच पत्र केले व्हायरल’
साधारण दीड महिन्यापूर्वीचे हे पत्र आता मुद्दाम व्हायरल करण्यात आल्याचा आरोप निरुपम समर्थकांकडून केला जात आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षाला स्थैर्य मिळवून देण्याची भाषा करणाऱ्या तरुण नेत्याने लोकसभेतील पराभूत उमेदवाराचे तक्रारीचे पत्र माध्यमांत व्हायरल केल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांबाबत तक्रारीचे हे पत्र देवरा यांनीच माध्यमांपर्यंत पोहोचविले. पक्षाला स्थैर्य मिळवून देण्याची देवरांची हीच पद्धत आहे का, असा सवालही निरुपम यांनी टिष्ट्वटरद्वारे केला.


‘भार्इं’चीही वादात उडी

थेट नाव न घेता एकमेकांवर शरसंधान साधण्याचे काम सध्या मुंबईतील नेत्यांकडून केले जात आहे. रविवारी निरुपम यांनी देवरा यांना ‘कर्मठ’ असे संबोधत खिल्ली उडविली होती. त्याविरोधात आज काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी टिष्ट्वट केले. कॉँग्रेस नेते असल्याचा दावा करणारे काही जण प्रत्यक्षात जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात. सहकारी नेत्यांचा अपमान करत, त्यांच्याच मतदारसंघात घुसखोरी करत निवडणूक लढवतात आणि २.७ लाख मतांनी पराभूत होतात. अशा ‘कर्मठ’ नेत्यांपासूनच सावध होण्याची गरज असल्याचे टिष्ट्वट भाई जगताप यांनी केले.


Web Title: Urmila defeats blame on Nirupam supporters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.