Join us  

...ताेपर्यंत स्वच्छ हवेसाठीचा कोणताही कृती कार्यक्रम यशस्वी होणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 2:40 AM

पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत; सशक्त जनचळवळ उभी राहणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरातील लोकांमध्ये जनजागृती करून त्यांच्या सहभागाने एक सशक्त जनचळवळ उभी राहिल्याशिवाय स्वच्छ हवेसाठीचा कोणताही कृती कार्यक्रम यशस्वी होऊ शकणार नाही, असे स्पष्ट मत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पर्पज, असर आणि क्लायमेट ट्रेंड्स या तीन संस्थांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या क्लायमेट व्हाइसेस आणि माझी वसुंधरा (महाराष्ट्र पर्यावरण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित आभासी सभेचे यजमानपद ना नफा तत्त्वावरील वातावरण फाउंडेशन आणि सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायरनमेंट (सीएसई) यांनी भूषविले. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणार असलेल्या अशा प्रकारच्या एकूण चार सभांपैकी वायू प्रदूषणावर आयोजित करण्यात आलेली ही पहिली सभा होती. पुणे येथील पल्मोकेअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनचे डॉ. संदीप साळवी यांनी आरोग्यविषयक चिंता व्यक्त करताना म्हणाले, लँसेट प्लॅनेटरी हेल्थसोबत केलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये श्वसनसंस्थेच्या समस्या घेऊन येणारे सर्वाधिक आहेत. निकट सानिध्यामुळे लोकांच्या आरोग्याला  बाधक असणारे घरातील  प्रदूषणही दुर्लक्षित आहे.

‘विज्ञानाचे सुलभीकरण महत्त्वाचे ठरणार’सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरनमेंटच्या कार्यकारी संचालक अनुमिता रॉय म्हणाल्या, स्थानिक पातळीवर लोकजागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. लोकांचा सहभाग मिळविल्याशिवाय प्रभावी बदल घडू शकणार नाहीत. नागरिकांचे शास्त्र, पारदर्शी आणि सहज उपलब्ध असलेली माहिती, विज्ञानाचे सुलभीकरण आणि आरोग्यविषयक माहितीचा प्रसार या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील.