Join us  

समाजातील अपरिचित नायकांचा 'एम्पल मिशन अवॉर्ड्स ऑफ इंस्पिरेशेन'ने सन्मान

By संजय घावरे | Published: April 26, 2024 6:38 PM

संजीवनी वर्ल्ड स्कूलमध्ये आयोजित केलेल्या २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील असामान्य व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

मुंबई - समाजात दडलेल्या अपरिचित नायकांना नुकतेच 'एम्पल मिशन अवॉर्ड्स ऑफ इन्स्पिरेशन'ने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये सैन्य-संरक्षण दलांतील व्यक्ती, तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केलेल्या व्यक्ती, पोलीस आणि अग्निशमन दलातील अधिकारी, इतरांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या शूरवीर, २६/११ घटनेतील नायक, क्रीडा जगतातील दिव्यांग खेळाडूंना प्रेरणा देणाऱ्यांचा समावेश आहे. 

संजीवनी वर्ल्ड स्कूलमध्ये आयोजित केलेल्या २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील असामान्य व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. २०१४ मध्ये सुरु झालेल्या या पुरस्काराचे नाव डॉ. अनिल काशी मुरारका यांच्या संकल्पनेतून साकारले असून, ते एम्पल मिशन या सामाजिक संस्थेपासून प्रेरीत आहे. या सोहळ्याला डॉ. अनिल मुरारका, शहीद भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग, मंजीत कौर, अभिनेते सूरज थापर, राकेश श्रीवास्तव, बॉबी खान आणि संजीवनी वर्ल्ड स्कूलच्या प्रिन्सिपल डॉ. सीमा नेगी उपस्थित होत्या. यावेळी भारतातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव, २६/११च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात अतिशय शूरपणे २० गर्भवती महिलांचे आयुष्य वाचविणाऱ्या नर्स अंजली कुलथे, स्वतःचे आयुष्य धोक्यात घालून रेल्वे रुळांवर अडकलेल्या सहा वर्षाच्या मुलाची धाडसीपणे सुटका करणारा मयूर शेळके, वाईल्ड लाईफ  टॅक्सीडर्मिस्ट डॉ. संतोष गायकवाड, शूर आर्मी कमांडो मधुसूदन सुर्वे, पोलीस अधिकारी तसेच शरीर सौष्ठव विजेते सुभाष पुजारी, ट्रान्सजेंडर सुपरमॉडेल आणि डान्सर नाव्या सिंग, भारतीय व्हीलचेयर क्रिकेट संघाचे कॅप्टन रमेश सरतापे, मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटात वाचलेले व त्यानंतर पॅरालिम्पिक तिरंदाजीसाठी आशावादी ठरलेले महेंद्र पितळे, भारतीय महिला व्हीलचेअर बास्केटबॉल संघाची कप्तान गीता चौहान, अंडर प्रिव्हिलेज क्षेत्रांमधील लोकांकरिता मोफत नेत्र शस्त्रक्रिया करणाऱ्या समाजसेविका डॉ. आरती अग्रवाल, १९ वर्षांचा तरुण उद्योजक श्रेयान दागा, कोविड १९ महामारी आग दुर्घटनेत लोकांना वाचवणारे मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी संतोष सावंत, अनिल परब हरिश्चंद्र गिरकर आणि विनायक माईणकर, पूरग्रस्त गावातील लोकांची सुटका करणारे तसेच समुद्रातून मच्छीमारांची सुटकार करणारे भारतीय कोस्ट गार्ड सुलतान सिंग, सरन आर विजयन यांना असामान्य कर्तृत्वाबद्दल सन्मानित करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा त्यांना प्रोत्साहित करणारा ठरला. 

एम्पल मिशन ही सामाजिक संस्था तीन दशकांहून अधिक काळ शिक्षण, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता या क्षेत्रात सामाजिक कल्याण आणि उन्नतीसाठी कार्यरत असून, उपेक्षित समुदायांसाठी सर्वसमावेशकता, सार्वजनिक सुविधांचे बांधकाम, स्मशानभूमी, मंदिरे आणि रस्ता सुरक्षा प्रकल्प अशा अनेक उपक्रमांत कार्यरत आहे. 

टॅग्स :मुंबई