Join us  

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची आज होणार निवड; राज्यपाल साधणार अंतिम पाच उमेदवारांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:42 AM

सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची अंतिम प्रक्रिया आज पार पडणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे कुलगुरू पदासाठी दावेदार ठरलेल्या त्या अंतिम पाच उमेदवारांशी संवाद साधणार आहेत.

मुंबई : सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची अंतिम प्रक्रिया आज पार पडणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे कुलगुरू पदासाठी दावेदार ठरलेल्या त्या अंतिम पाच उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे गुरुवारी अंतिम नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पाच जणांमध्ये कोणाचा समावेश आहे, याची अधिकृत माहिती अद्याप राजभवनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर केल्यानंतर नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती गठीत केली होती. या समितीने गेल्याच आठवड्यातअंतिम पाच जणांची नावे राज्यपालांकडे सुपुर्द केली होती. त्यानुसार या पाच जणांना अंतिम सादरीकरणासाठी गुरुवारी राजभवनात आमंत्रित करण्यात आले असून, सकाळी ११.३० वाजल्यापासून हे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे. त्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव अंतिम नाव जाहीर करतील. त्यामुळे नव्या कुलगुरूंचे नाव गुरुवारीच जाहीर करण्यात येईल, असे जवळपास निश्चितच मानले जात आहे.या पाच नावांची चर्चा- कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समितीने सुपुर्द केलेल्या पाच नावांच्या बाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, शेवटच्या पाचमध्ये कोण याचीच चर्चा विद्यापीठात रंगताना दिसली.- पाच नावांच्या बाबतीत गुप्तता पाळण्यात आली असली तरीदेखील डॉ. प्रमोद येवले (नागपूर विद्यापीठ), डॉ. सुहास पेडणेकर (रुईया कॉलेज), डॉ. विलास सकपाळ (अमरावती विद्यापीठ), डॉ. शरद कोंडेकर (जबलपूर विद्यापीठ), डॉ. अनिल कर्णिक (मुंबई विद्यापीठ) ही संभाव्य नावे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.राजकीय हस्तक्षेप नकोविद्यापीठ कायद्याच्या नियम ११ (३)प्रमाणे खरेतर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असायला हवी. मात्र, शोध समितीच्या ३४ नावांची आणि शेवटच्या ५ नावांचीही कुठेच वाच्यता का करण्यात आली नाही, असा सवाल माजी प्र-कुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांनी केला. कुलगुरू नियुक्ती ही राजकीय हस्तक्षेपाविना पारदर्शकपणे व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ