Join us  

अपंग विद्यार्थ्याशी विद्यापीठाचा असहकार! सात दिवसांचा उशीर झाल्याने रिसर्च घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 2:23 AM

रिसर्च सादर करण्यास ७ दिवसांचा उशीर झाल्याने, मुंबई विद्यापीठाने एलएलएमच्या चौथ्या सत्राला असलेल्या संतोषकुमार यादवचा रिसर्च सबमिट करून घेण्यास नकार दिला आहे.

मुंबई : रिसर्च सादर करण्यास ७ दिवसांचा उशीर झाल्याने, मुंबई विद्यापीठाने एलएलएमच्या चौथ्या सत्राला असलेल्या संतोषकुमार यादवचा रिसर्च सबमिट करून घेण्यास नकार दिला आहे. विद्यापीठाच्या या असहकारामुळे दोन्ही हात नसलेल्या संतोषकुमार यादवचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, रिसर्च सबमिट करण्यास उशीर होईल, त्यामुळे अतिरिक्त वेळ देण्यात यावा, असे निवेदन त्याने यापूर्वीच दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.वयाच्या ५व्या वर्षी संतोषला अपघातात दोन्ही हात गमवावे लागले. मात्र, त्याने जिद्दीच्या जोरावर शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही हात नसल्याने पायांचाच वापर हात म्हणून करत त्याने एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर, एलएलएमसाठी प्रवेश घेतला. एलएलएमच्या शेवटच्या वर्षाचा रिसर्च अत्यंत अवघड असतो. संतोषने तोही पूर्ण केला. मात्र, त्यासाठी आधीच निवेदन देऊन अतिरिक्त वेळेची मागणी मुंबई विद्यापीठाकडे केली होती. ६ जून ही रिसर्च सादर करण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे सादरीकरण स्वीकारले जणार नाही, असे सांगत मुंबई विद्यापीठाच्या लॉ डिपार्टमेंटकडून त्याचा रिसर्च नाकारण्यात आला. यामुळे आता संतोषचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.संतोषने या प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला भेट नाकारण्यात आल्याची खंत त्याने व्यक्त केली.‘अपंग असल्याने रिसर्च सादर करण्यास उशीर होईल, तरी आपण मला त्यासाठी मुदत वाढवून द्यावी,’ अशा विनंतीचे निवेदन संतोष कुमारने देऊनही मुंबई विद्यापीठाकडून त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्याचा रिसर्च नाकारण्यात आला. त्यामुळे निकाल लावण्यात ४ -६ महिने दिरंगाई करणाऱ्या मुंबई विद्यापीठाला अपंग विद्यार्थ्याच्या मेहनतीची आणि शैक्षणिक जिद्दीची कदर नाही का, असा सवाल स्टुडन्ट लॉ कौन्सिलने उपस्थित केला आहे.आवश्यक कार्यवाही करूलॉ विभागाच्या प्रमुख रश्मी ओझा यांनी रिसर्च सबमिट करून घेण्यास नकार दर्शविल्यानंतर, या संदर्भात मुंबई विद्यापीठाचे डीन मुरलीधर कुºहाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करू, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.२० जणांचेरिसर्च नाकारले‘लॉ’ विभागाच्या प्रमुख रश्मी ओझा यांनी याप्रकरणी संतोष कुमार यादवला अधिक माहिती देताना सांगितले की, वेळेत रिसर्च सादर न केल्याने, आणखी२० जणांचे रिसर्च नाकारण्यात आले आहेत.तेव्हा वेळेचे बंधन नव्हते का?मुंबई विद्यापीठ आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिव्यांग विद्यार्थ्यांना सोईसवलती द्याव्यात, असे परिपत्रक व शासन निर्णय असतानाही मुंबई विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. निर्णय केवळ कागदोपत्रीच आहे का? विद्यापीठाने निकाल उशिरा लावून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावले, तेव्हा वेळेचे बंधन नव्हते का? मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे.- सचिन पवार, अध्यक्ष स्टुडन्ट लॉ कौन्सिल

टॅग्स :मुंबई