Join us  

विद्यापीठाच्या निकालात पुन्हा गोंधळ, अनेक विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेत नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:24 AM

गेल्या काही महिन्यांपासून भोंगळ कारभारामुळे टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. या वेळी निमित्त ठरले ते विधि शाखेच्या निकालांचे. विधि शाखेच्या रखडलेल्या निकालांपैकी तीन विषयांचे निकाल शुक्रवारी, १४ एप्रिलला जाहीर झाले.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भोंगळ कारभारामुळे टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. या वेळी निमित्त ठरले ते विधि शाखेच्या निकालांचे. विधि शाखेच्या रखडलेल्या निकालांपैकी तीन विषयांचे निकाल शुक्रवारी, १४ एप्रिलला जाहीर झाले. मात्र, प्रॅक्टिकल परीक्षेत अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी चक्रावून गेले आहेत.जाहीर झालेल्या निकालात बॅचलर आॅफ लॉ (एलएलबी) सत्र ४ आणि ६, मास्टर आॅफ लॉ (एलएलएम) सत्र ३चा समावेश आहे. यात अनेक विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षेत नापास करण्यात आले आहे. निकालाचा हा टक्का खूपच कमी असून विद्यापीठाने नैतिक जबाबदारी स्वीकारत पुनर्मूल्यांकन करावे आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नापास झालेले विद्यार्थी व संघटनांकडून होत आहे.एलएलएमच्या सत्र ३ मध्ये प्रत्येकी १०० गुणांचे दोन लेखी पेपर व १०० गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा असते. त्यामध्ये ह्युमन राइट्स लॉ या ग्रुपमधून ७६ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी २२ विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षेत १०० पैकी ५० पेक्षाही कमी गुण देण्यात आले आहेत.प्रॅक्टिकलमध्ये ५० पेक्षा कमी गुण असल्याने अनेक विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे.मुंबई विद्यापीठातील सत्र ३च्या प्रॅक्टिकलचे गुण हे विद्यापीठातील शिक्षक देतात. एलएलएमच्या अभ्यासक्रमात एकूण सहा ग्रुप आहेत. त्यापैकी फक्त ह्युमन राइट्स ग्रुपमधल्या ७६ पैकी २२ विद्यार्थ्यांनाच ५० पेक्षाही कमी गुण देण्यात आले आहेत.त्यामुळे लेखीत पास होऊनही प्रॅक्टिकलमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या हातात इंटरर्नल मार्क ठेवायचे कीनाही, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.आधीच निकाल वेळेत न लागल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. त्यात घाईघाईत निकाल लावण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून नापास केले जात असेल, तर हे भयंकर आहे. विद्यार्थ्यांच्या यासंदर्भातील अनेक तक्रारी येत आहेत. विद्यापीठाने याची जबाबदारी घेत फेर तपासणी करायला हवी.- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल

टॅग्स :मुंबई विद्यापीठ