Join us  

खेळण्यांवरील आयात शुल्कवाढीमुळे पाच लाख जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 1:50 AM

युनायटेड टॉयज असोसिएशनचा आरोप; निर्णय मागे घेण्याची मागणी

मुंबई : खेळण्यांवरील आयात शुल्कात २० टक्क्यांवरून ६० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे खेळण्याच्या दरात दीडपट ते दुप्पट वाढ होईल. हे ग्राहकांना परवडणारे नाही. यामुळे मागणी कमी होईल. साहजिकच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या पाच लाखांहून अधिक लोकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळेल, असे युनायटेड टॉयज असोसिएशनने सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच पत्रकार परिषदेनंतर या विरोधात सोमवारी आझाद मैदान येथे निदर्शनेही करण्यात आली.

खेळण्यांवरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर ३-४ महिन्यांतच भारतात खेळण्यांचा तुटवडा निर्माण होईल. कारण भारत ८५ टक्के खेळणी इतर देशांमधून आयात करतो. भारतात खेळण्यांच्या वार्षिक गरजेच्या केवळ १५ टक्के खेळण्यांचे उत्पादन होते. व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना उच्च आयात शुल्क परवडणारे नाही आणि ते खेळणी आयात करणे बंद करतील. दुसरीकडे, भारतीय उत्पादकांना खेळण्यांची प्रचंड मागणी पूर्ण करता येणार नाही आणि पुढील ३-४ महिन्यांत खेळण्यांचा साठा संपेल. या निर्णयामुळे देशभरातील पाच लाख लोकांच्या (खेळण्यांचे व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि यासंबंधित सर्व लोक) उत्पन्नावर वाईट परिणाम होईल, असे युनायटेड टॉयज असोसिएशनचे अध्यक्ष फारुक एम. शब्दी यांनी सांगितले.तर, भारतात पुरेशा प्रमाणात उत्पादन होत नसलेल्या आवश्यक वस्तूंच्या आयात शुल्कात अशा अनुचित वाढीचा आम्ही निषेध करतो. खेळण्यांच्या किंमती वाढल्या आणि विक्री कमी झाली तर खेळण्यांचे व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांसंबंधित सर्व लोकांच्या जीवनावर विपरित परिणाम होईल; यामुळे व्यवसाय बंद पडतील आणि बेकारी वाढेल. खेळण्यांवरील आयात शुल्कात २००% प्रस्तावित वाढीविरोधात लढा देणार असून खेळण्यांवरील आयात शुल्क वाढविणारा अवास्तव निर्णय मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन सरकारला देणार आहोत, असे युनायटेड टॉय्ज असोसिएशनचे उपाध्यक्ष अब्दुल्ला शरीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबई