Join us  

बेरोजगारीतून तरुणाने वरळी सी-लिंकवरून घेतली समुद्रात उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:09 AM

सी-लिंक कर्मचारी आणि पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या काळात नोकरी सुटली. अशात बेरोजगारीतून ...

सी-लिंक कर्मचारी आणि पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या काळात नोकरी सुटली. अशात बेरोजगारीतून तरुणाने वरळी सी-लिंकवरून समुद्रात उडी घेतली. सी-लिंकच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याच्याकडे धाव घेतली. वरळी पोलिसांनी त्याच्या बचावासाठी पावले उचलली. दुसरीकडे जेट्टीपर्यंत मोबाइल व्हॅन पोहोचत नसल्याने तरुणाला दुचाकीवर मध्यभागी बसवत रुग्णालयात दाखल केल्यामुळे तरुणाचे प्राण वाचल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वरळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास एका तरुणाने वरळी सी-लिंकवरून समुद्रात उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची वर्दी लागताच, वरळी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी समुद्राकडे धाव घेतली. तेव्हा एक तरुण पाण्यामध्ये गटांगळ्या घेत असल्याचे दिसत असताना सी-लिंकचे सुपरवायझर चेतन कदम आणि कर्मचारी विवेक सावंत हे वरळी कोळीवाडा जेट्टी मार्गाने सी-लिंक ब्रिजखालून घटनास्थळी पोहोचले. खडकात अडकलेल्या तरुणाला बाहेर काढले. वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी त्यांच्या दिशेने पोर्टेबल स्ट्रेचर फेकला. त्याच स्ट्रेचरवरून तरुणाला जेट्टीपर्यंत आणण्यात आले.

जेट्टीवर पोलिसांकडून त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. जेट्टीपर्यंत मोबाइल व्हॅन पोहोचत नसल्यामुळे कदम आणि सावंत यांनी दुचाकीच्या मध्यभागी तरुणाला बसवत पोद्दार रुग्णालयात दाखल केले. तरुणाला वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले.

तेथून पुढील उपचारासाठी तरुणाला नायर रुग्णालयात हलवले. त्याच्याकडील मोबाइलमधून पोलिसांनी त्याच्या आईशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. पुढे आलेल्या चौकशीत, त्याचे नाव राहुल हिरन गटीया (३२) असून, तो वाळकेश्वरचा रहिवासी आहे.

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या राहुलची कोरोनामुळे नोकरी गेली. घरातील एकुलता मुलगा असल्याने तो बेरोजगारीमुळे नैराश्येत होता. सोमवारी दुपारी भायखळावरून वांद्रेकडे जाण्यासाठी तो टॅक्सीने वरळी सी-लिंकवर पोहोचला. तेथे टॅक्सी थांबवून त्याने पाण्यात उडी घेतल्याचे कोळी यांनी सांगितले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी नमूद केले.