Join us  

बिबट्याचे लोकेशन त्वरित समजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 3:23 AM

रेडिओ कॉलरिंग तंत्रज्ञान : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा प्रकल्प

मुंबई : ‘रेडिओ कॉलरिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संजय गांधी उद्यानातील बिबट्यांचे लोकेशन आता त्वरित समजणार आहे. बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाने बिबट्यांच्या व्यवस्थापनात विज्ञानाची मदत घेण्यासाठी वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी (डब्ल्यूसीएस) या संस्थेबरोबर विशेष करार केला आहे. करारानुसार दोन वर्षांसाठी एक अभ्यास प्रकल्प सुरू होत असून, त्यात रेडिओ कॉलरिंग तंत्राचा वापर करून बिबट्यांचा अभ्यास केला जाईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याबाहेरील परिसराचा वापर बिबटे कसे करतात हे समजून घेणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती उद्यानाचे मुख्य संचालक अन्वर अहमद यांनी दिली.वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी आॅफ इंडियाच्या संशोधिका डॉ. विद्या आत्रेया याबाबत म्हणाल्या की, या अभ्यासातून मांसभक्षी प्राण्यांबाबत मौलिक माहिती मिळेल. या कॉलर्समधील सिग्नल उपग्रहाकडे पाठविला जाईल. त्या वेळी तारीख आणि वेळेची अचूक नोंद होईल. मग ही माहिती अभ्यासकाकडे पोहोचविली जाईल. माहिती मिळताच तो प्राणी कुठे आहे, काय करीत आहे, याचा प्रत्यक्ष शोध घेता येईल.कॉलर म्हणजे काय?बिबट्याला बेशुद्ध करून त्याच्या मानेवर पट्टा बसविण्याच्या प्रक्रियेला ‘कॉलर’ असे म्हणतात. बिबट्याच्या मानेवर लावण्यात येणाऱ्या कॉलरमध्ये अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स डिवाईसेस बसविले जाणार आहे. याद्वारे बिबट्याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.तंत्रशुद्ध पद्धतीने अभ्यासबिबट्या हा स्वभावताच संकोची, बुजरा प्राणी असल्याने त्याचे निरीक्षण करणे अवघड असते. पण कॅमेरा ट्रॅपिंग आणि कॉलरिंग या दोन्ही तंत्रांचा वापर करून बिबट्याच्या प्रजातीबाबत खूप माहिती मिळू शकते. गेली तीन वर्षे या परिसरात कॅमेरा ट्रापिंगचा वापर केला जात आहे. आता याला रेडिओ कॉलरिंगची जोड मिळणार आहे.याआधीही प्रयोग२००९ साली अहमदनगर वनविभागाने बिबट्यांना कॉलर्स बसविल्या होत्या. यापैकी ‘आजोबा’ हा बिबट्या माळशेज घाटातून १२५ किलोमीटर अंतर पार करून मुंबईत पोहोचला होता. या बिबट्याची अद्ययावत माहिती कॉलरिंग तंत्राद्वारे अचूक उपलब्ध झाली. हे तंत्रज्ञान वापरून मुंबई परिसरातील बिबट्यांना कॉलर बसविली जाईल.

टॅग्स :बिबट्या