Join us  

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आता रामराज्य निर्माणाचा प्रारंभ; मालाडच्या डायरो कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

By मनोहर कुंभेजकर | Published: December 25, 2023 2:04 PM

भाजप नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मालाड (पूर्व ) येथील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या ‘डायरो’ या लोकसंगीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. 

मुंबई :  भारतीय जनता पक्षाचे सरकार जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आले तेव्हा जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटले आणि प्रभू श्री राम मंदिरही तयार झाले. हे केवळ मंदिर निर्माण नाही तर नव्या भारताची सुरुवात आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रामराज्य निर्माणाचा  प्रारंभ आहे, असे ठाम प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री मालाड येथे केले. 

भाजप नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मालाड (पूर्व ) येथील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या ‘डायरो’ या लोकसंगीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी जे स्वप्न बघितले होते ते प्रत्यक्षात साकारण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ज्या ठिकाणी प्रभू श्री राम मंदिर तोडून बाबरी मशिदीचा ढाचा तयार केला होता त्याच ठिकाणी आता प्रभू श्री रामाचे मंदिर उभे राहिले आहे. येत्या दि,२२ जानेवारी रोजी तिथे प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ५००-५५० वर्षाच्या संघर्षाला आता अंतिम स्वरूप नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, दरवर्षी या डायरो कार्यक्रमाचे आम्ही आयोजन करत असतो. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमात सहभागी झाले ही आनंदाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईसह महाराष्ट्राचा विकास होत आहे. मुंबईतील अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो, कोस्टल रोड सारखे प्रकल्प मार्गी लावून त्यांनी सामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य केले असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला कांदिवली पूर्व विधासभेतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.