Join us  

विविध समस्यांच्या ‘ओझ्या’खाली मशीद रेल्वे स्थानकाचा श्वास गुदमरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 7:31 AM

मुंबईतील विविध वस्तुंच्या मोठमोठ्या बाजारपेठा असलेल्या मशीद बंदर येथील मशीद रेल्वे स्थानक सध्या विकासाच्या प्रतीक्षेत आहे.

अक्षय चोरगे मुंबई : मुंबईतील विविध वस्तुंच्या मोठमोठ्या बाजारपेठा असलेल्या मशीद बंदर येथील मशीद रेल्वे स्थानक सध्या विकासाच्या प्रतीक्षेत आहे. रेल्वे स्थानकावरील सर्व जिने अतिशय अरुंद आहेत. या जिन्यांवर गर्दीच्या वेळी धक्काबुक्की रोजची ठरलेली आहे. मशीद रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वेच्या गाड्या थांबतात. त्यामुळे अरुंद जिने आणि अरुंद पूल हे येथील प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहेत. रेल्वे स्थानकावरील मधल्या पुलावर नेहमीच गर्दुल्ले असतात. त्यामुळे महिला, लहान मुले या पुलाचा वापर करणे टाळतात. ही समस्या कायमची मिटविण्यात यावी, असे प्रमुख म्हणणे महिला प्रवाशांनी मांडले आहे.मशीद रेल्वे स्थानकावर तीन अरुंद पादचारी पूल आहेत. या पुलावरील जिन्यातून केवळ तीन व्यक्ती सहजपणे चढू-उतरू शकतात. एकाच वेळी फलाटांवर दोन लोकल आल्या, तर जिन्यांसमोर गर्दी जमते, धक्काबुक्की होते. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे अशा दोन्ही मार्गांवरील लोकल जर स्थानकात आल्या, तर पुलांवर प्रचंड गर्दी जमते. त्यातून अनेक वेळा वाद निर्माण होतात, तसेच अनेकदा या गर्दीमुळे मोठी भांडणे झाल्याचेही प्रवाशांनी सांगितले. स्थानकात वाढती गर्दी रेल्वे पोलिसांना हस्तक्षेप करून नियंत्रित करावी लागते.अखेर प्रशासनाला जाग आलीएल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. मागील आठवड्यात रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून मशीद रेल्वे स्थानकाचे सर्वेक्षण करण्यातआले आहे. यात स्थानकातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात, याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला.तिकीटघर हवेमशीद रेल्वे स्थानकावर दक्षिणेकडे एक तिकीटघर आहे आणि उत्तरेकडे एक. दोन्ही तिकीटघरांसमोर दिवसभर प्रवाशांच्या तिकिटासाठी रांगा असतात. स्थानकावरील एटीव्हीएम मशिनही नेहमीच बंद असतात. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाइतका वेळ तिकीट खरेदी करण्यासाठी लागतो. त्यामुळे अजून तिकीटघराची आवश्यकता आहे, अशी समस्या प्रवाशांकडून मांडण्यात आली.सरकत्याजिन्याची गरजमजूर, हमाल आणि कामगार वर्गाकडून मशीद रेल्वे स्थानकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ओझी घेऊन कामगार रुंद जिन्यांवरून चढ-उतार करतात. त्यांच्यासाठी रेल्वे स्थानकावर किमान एक तरी सरकता जिना असावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.पूल, जिने आणि फलाटांचेही रुंदीकरण व्हायला हवे. तीन पूल अपुरे पडत असल्यामुळे स्थानकावर नवा फूट ओव्हर ब्रीज उभारावा. रेल्वे स्थानकावरील गर्दुल्ले आणि फेरीवाल्यांचा बंदोबस्त करायला हवा.- ताहीर उनवाला, प्रवासीमशीद रेल्वे स्थानकावरील एकही पूल रुंद नाही. त्या पुलांचे रुंदीकरण गरजेचे आहे. तीन पुलांपैकी किमान एक पूल रेल्वे स्थानकाच्या बाहेर काजी सय्यद स्ट्रीटपर्यंत वाढवावा. त्याचा प्रवाशांना खूप फायदा होईल. मधल्या पुलावरील गर्दुल्ले हटविले, तर त्या पुलाचाही वापर केला जाईल.- गणेश बांगर, प्रवासीमधल्या पुलावर गर्दुल्ले असतात. त्यामुळे महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक त्या पुलाचा वापर करत नाहीत. दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील पुलावर मोठी गर्दी होते. त्यात बहुतेक वेळा तेथे फेरीवाले बसतात. मुळातच पूल अरुंद त्यात फेरीवाल्यांची अधिक भर, त्यामुळे पुलांवरून चालणे मुश्कील होते.- जयश्री ठोंबरे, प्रवासरेल्वेस्थानकावरील जिने आणि पुलांचे रुंदीकरण आवश्यक आहे. एकाच वेळी दोन-तीन लोकल रेल्वे स्थानकावर आल्या, तर फलाटावरून बाहेर पडायला खूप वेळ लागतो. धक्के खात पुलांवरून चालावे लागते.- फातिमा शेख,प्रवासी

टॅग्स :मुंबई लोकल