Join us  

‘त्या’ आयांवर अदखलपात्र गुन्हा, उद्या डीएनए चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 2:17 AM

बक्षिसीच्या हव्यासापोटी मुलीऐवजी मुलगा झाल्याची माहिती नातेवाइकांना देणे, कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील आयांच्या अंगलट आले आहे. रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी कांदिवली पोलिसांत दोघींवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

मुंबई : बक्षिसीच्या हव्यासापोटी मुलीऐवजी मुलगा झाल्याची माहिती नातेवाइकांना देणे, कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील आयांच्या अंगलट आले आहे. रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी कांदिवली पोलिसांत दोघींवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दरम्यान, नवजात शिशू व प्रसूती झालेल्या महिलेची डीएनए चाचणी सोमवारी करण्यात येणार येणार असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता ए. आंग्रे यांनी सांगितले.सोनी नावाच्या महिलेची प्रसूती शुक्रवारी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात झाली. तिने मुलाला जन्म दिल्याची माहिती आयांनी नातेवाइकांना दिली. प्रत्यक्षात ती मुलगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाइकांनी डॉक्टरांसोबत वाद घातला. मूल बदलण्यात आल्याचा आरोप केला. अखेर डीएनए चाचणी करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला.दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी कांदिवली पोलिसांत अदखलपात्र गुन्हा नोंदवला. तर तक्रारदार, रुग्णालयातील काही लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदविल्याचे आंग्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मोठी बक्षिसी मिळविण्याच्या मोहामुळे खोटे बोलल्याची कबुली आयांनी दिली आहे. मात्र मूल बदलण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने, डीएनए चाचणीचा निर्णय रुग्णालयाने घेतला आहे. शनिवार आणि रविवार लॅब बंद असल्याने, सोमवारी आई आणि बाळाच्या रक्ताचे नमुने काढून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत, असे आंग्रे यांनी सांगितले.च्बाळाची आई त्याची वेळच्या वेळी काळजी घेत असून, हे माझेच बाळ आहे, असे तिचे म्हणणे आहे. मात्र, संशयाला थारा नको, म्हणूनच आम्ही ही चाचणी करणार असल्याचेही आंगे्र यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई