Join us  

गेटवे ऑफ इंडियावर विनापरवानगी जाहिरात, शीतपेय कंपनीला दणका, पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयाची कारवाई

By स्नेहा मोरे | Published: March 19, 2024 11:23 PM

Mumbai News: एका प्रसिद्ध शीतपेय कंपनीने विनापरवानगी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेट वे ऑफ इंडिया या राज्य संरक्षित स्मारकावर त्यांच्या कंपनीच्या शीतपेयाची प्रतिकृती झळकत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

मुंबई - एका प्रसिद्ध शीतपेय कंपनीने विनापरवानगी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेट वे ऑफ इंडिया या राज्य संरक्षित स्मारकावर त्यांच्या कंपनीच्या शीतपेयाची प्रतिकृती झळकत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठीच्या चित्रीकरणाकरिता, कार्यक्रमाकरिता संचालनालयामार्फत त्यांना कोणतीही परवानगी घेतली नाही. त्याचप्रमाणे व्यावसायिक जाहिरातीकरिता राज्य संरक्षित स्मारकांचा वापर करण्यास मनाई आहे, त्यामुळे तत्काळ ही जाहिरात हटवण्याच्या सूचना दिल्याचे डॉ. गर्गे यांनी सांगितले आहे.

गेटवे ऑफ इंडिया हे राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अन्वये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार, राज्य संरक्षित स्मारक परिसरात कोणतीही जाहिरात करण्यापूर्वी त्याचप्रमाणे कोणताही कार्यक्रम - चित्रीकरण करण्याकरिता संचालनालयाची सर्व पातळ्यांवर लेखी परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहे, अशी माहिती पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी दिली आहे.

शीतपेय कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरील जाहिरात संकेतस्थळावरून काढण्यात यावी. विनापरवानगी अनधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी. तसेच, पुरातत्व व वस्तूसंग्रहालयांचा जाहिरातीसाठी अनधिकृतपणे वापर करण्यात येणार नाही, असे प्रसिद्ध करण्यात यावे आणि तसे संचालनालयास लेखी कळविण्यात यावे, अशी सूचना कंपनीला दिलेल्या पत्रात नमूद केल्याचेही गर्गे यांनी सांगितले आहे. या अनुषंगाने योग्य दखल घेतली गेली नाही तर कडक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईइतिहास