Join us  

अखेर मुलुंड कचराभूमीला लागणार टाळे; रहिवाशांना मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 3:20 AM

मुंबईतील मोठ्या कचराभूमीपैकी एक असलेली मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून १ आॅक्टोबरपासून या कचराभूमीला टाळे लागणार आहे.

मुंबई : मुंबईतील मोठ्या कचराभूमीपैकी एक असलेली मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून १ आॅक्टोबरपासून या कचराभूमीला टाळे लागणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे नाक मुठीत घेऊन जगणाऱ्या मुलुंडच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.मुंबईत दररोज सुमारे सात हजार २०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा मुलुंड, कांजूर व देवनार कचराभूमीवर टाकण्यात येतो. यापैकी २४ हेक्टर्स जागेवरील मुलुंड कचराभूमीची क्षमता संपुष्टात आली आहे. या कचराभूमीमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे ही कचराभूमी बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून होत होती. मुंबईतील कचराभूमीवरील भार कमी करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांना यश येत असल्याने अखेर मुलुंडची कचराभूमीतून सुटका होणार आहे.त्यानुसार १ आॅक्टोबरपासून मुलुंड कचराभूमीवर कचरा टाकणे बंद करण्यात येणार आहे. ही कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला महापालिकेने इरादापत्र दिले आहे. सध्या मुलुंड कचराभूमीवर दोन हजार मेट्रिक टन कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ही कचराभूमी बंद झाल्यानंतर हा कचरा देवनार आणि कांजूरमार्ग येथे वळविण्यात येणार आहे.- मुलुंड कचराभूमीवरील ७० लाख मेट्रिक टन कचरा उपसण्यासाठी महापालिकेने जूनमध्ये ठेकेदार नेमला. त्यानुसार पुढील सहा वर्षांत ७३१ कोटी रुपये खर्च करून टप्प्याटप्प्याने मुलुंड कचराभूमी बंद करण्यात येणार आहे.याआधी मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी महापालिकेने अनेक वेळा निविदा मागविल्या. मात्र ठेकेदारांनी स्वारस्य न दाखवल्याने हा प्रकल्प रखडला होता. अखेर तीन वेळा निविदा मागविल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात एका ठेकेदाराने मुलुंड कचराभूमी बंद करण्याच्या कामात स्वारस्य दाखवले आहे.मुंबईत दररोज सुमारे सात हजार दोनशे मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा मुलुंड, देवनार आणि कांजूरमार्ग कचराभूमीवर पाठविण्यात येतो.

टॅग्स :मुंबई