Join us

राज्यात युतीची गाठ सुटणार नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 1, 2014 11:42 IST

महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांची गाठ पक्की असून, युतीची गाठ सुटणार नसल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.१ - शिवसेना-भाजप युतीमध्ये तणाव वगैरे असल्याच्या अफवांचा इन्कार करत 'महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांची गाठ पक्की असल्यानेच युतीची गाठ सुटणार नसल्याचा विश्वास शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले.
हरियाणामध्ये भाजप व हरियाणा जनहित काँग्रेसची तीन वर्षांची युती संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसैनिकांची अस्वस्था समोर आली आहे. त्यातच भाजपने दबावतंत्र वाढवत राज्यात स्वतंत्र लढण्यासाठी चाचपणी सुरू केल्याने या अस्वस्थेत आणखी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 
' शिवसेना-भाजप युतीमध्ये तणाव वगैरे असल्याच्या अफवा अधूनमधून उठत असतात, मात्र आम्ही शिवसेना-भाजपात कोणताही तणाव किंवा अस्वस्थता असल्याच्या बातम्यांचा इन्कार करत आहोत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या अफवांचे पेव जास्तच फुटणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती हा राजकीय उथळपणाचा खळखळाट नसून हिंदुत्वाचा अथांग सागर असल्याचे लेखात म्हटले आहे. शिवसेना-भाजपचे हिंदुत्ववादी व अखंड महाराष्ट्रवादी राज्य यावे. हरयाणा, बिहारात हिंदुत्ववादी विचारांची गाठ नसल्यानेच तेथे गाठ सुटली, महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांची गाठ पक्की असल्यानेच ती सुटणार नाही, असा विश्वास अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे.