Join us  

उद्धव ठाकरे - ममता बॅनर्जी भेट; दुसरीकडे राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 1:51 AM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सदिच्छा भेट झाली. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नी तसेच ठाणे-डोंबिवलीतील प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी भेटले.

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सदिच्छा भेट झाली. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नी तसेच ठाणे-डोंबिवलीतील प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी भेटले.ममता बॅनर्जी तीन दिवसांपासून मुंबईत असून वेगवेगळ्या उद्योग समूहांशी चर्चा करून त्यांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध सध्या तोफ डागली असताना एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्या असलेल्या बॅनर्जी आणि दुस-या प्रादेशिक पक्षाचे नेते असलेले उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेकडे राजकीय अर्थानेही पाहिले जात आहे. प्रादेशिक पक्षांना किमान काही मुद्यांवर एकत्रितपणे काम करता येईल का याबाबत आज दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांप्रश्नी न्यायालयाचे निर्देश पाळावेत तसे झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. यापुढे फेरीवाल्यांवर रेल्वे अथवा महापालिकेने कारवाई न केल्यास फेरीवाल्यांवर कोर्टाचा अवमान केल्याच्या तक्रारी केल्या जातील, असेही राज यांनी स्पष्ट केले.ठाणे जिल्हाधिकाºयांच्या अखत्यारितील जमिनींवरच्या इमारतींचा प्रश्न आणि राज्यातील मराठी तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून आवश्यक असलेले स्टार्ट अप धोरण तातडीने लागू करावे या बाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज यांनी यावेळी फडणवीस यांचे अभिनंदन केले. मनसेचे काही नेतेही यावेळी उपस्थित होते.विशष म्हणजे उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटले त्यावेळी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे सोबत होते. राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हा त्यांचे पुत्र अमित सोबत होते.

टॅग्स :मुंबई