Join us  

उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून जाहीर केली अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी

By मनोहर कुंभेजकर | Published: March 10, 2024 10:26 AM

आगामी लोकसभा निवडणुक पुढच्या आठवड्यात  लागण्याची शक्यता आहे. सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून चर्चेचे गुऱ्हाळ आणि बैठका सुरू आहेत.

मनोहर कुंभेजकर

मुंबई-आगामी लोकसभा निवडणुक पुढच्या आठवड्यात  लागण्याची शक्यता आहे. सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून चर्चेचे गुऱ्हाळ आणि बैठका सुरू आहेत. पण अद्याप जागावाटपाची अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र त्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय खेळी खेळत मुंबईत लोकसभेचा  त्यांचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. 

उद्धव ठाकरेंनी काल सायंकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील अंधेरी पूर्व व जोगेश्वरी पूर्व ,वर्सोवा व अंधेरी पश्चिम येथील चार विधानसभा क्षेत्रातील चार शिवसेना शाखांना भेटी देवून त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.आणि या चारही विधानसभा मतदार संघात त्यांनीशिवसेना उपनेते आणि युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहिर केली.

जोगेश्वरी पूर्व विधानसभेत झालेल्या या भेटीच्या वेळी  शिवसेना नेते व विभागप्रमुख अँड.अनिल परब,शिवसेना नेते व विभागप्रमुख सुनील प्रभू,शिवसेना नेते व आमदार रवींद्र वायकर,शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर,रश्मी ठाकरे तसेच शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज सायंकाळी ठाकरे हे गोरेगाव आणि दिंडोशी येथील शाखांना भेटी देणार आहेत.

यावेळी जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या शिवसेना शाखेत

उद्धव ठाकरेंनी म्हणाले की, आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवार दिलेलाच आहे, असे म्हणत शिवसैनिकांनीच अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा केली. यानंतर ठाकरेंनी शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकरांना जवळ बोलावले आणि म्हणाले की, एका निष्ठेने आणि जिद्दीने जिंकणारच, या निष्ठेने अमोल लढतोय.अमोलच्या पाठीसुद्धा चौकशीच शुक्लकाष्ठ लावण्याचा प्रयत्न चालूच आहे. पण मी सगळ्यांना सांगतोय, सगळे दिवस सारखे नसतात. आज तुम्ही आमच्या मागे लागला आहात. पण उद्या येणार सरकार आमचं आहे आणि ते सरकार आल्यानंतर जे जे लोक माझ्या सैनिकांना त्रास देत आहेत. त्या सगळ्यांना मी तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही'', असा इशारा ठाकरेंनी भाजपला दिला. 

दरम्यान लोकमतने दि,18 मे 2023 रोजी अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्याचे सर्वप्रथम वृत्त दिले होते. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये अमोल कीर्तीकारांना साथ द्या! असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी, अंधेरी, दिंडोशी, गोरेगाव विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केले होते.

कोण आहेत अमोल कीर्तिकर

युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी आणि शिवसेना उपनेते आणि युवासेना सरचिटणीस या पदावर ते कार्यरत आहेत.या मतदार संघातील शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे ते पूत्र आहेत.विशेष म्हणजे 18 मे 2023 मध्ये ठाकरे यांनी मातोश्रीत त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिल्यावर त्यांनी लगेच कामाला देखिल सुरवात केली असून या मतदार संघात ते प्रत्येक कार्यक्रमांना ते जातीने उपस्थित असतात.

खासदार गजानन कीर्तिकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान अमोलला या मतदार संघातून काल ठाकरे यांनी अधिकृत उमेदवारी जाहिर केल्यावर आता त्याचे वडील आणि सलग दोन वेळा खासदार असलेले गजानन कीर्तिकर काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळात आणि मतदार संघात सर्वांचे लक्ष लागले आहे.हा जागा भाजपाला हवी असल्याची जोरदार चर्चा आहे.त्यामुळे अमोल कीर्तिकर विरुद्ध वडील गजानन कीर्तिकर अशी लढत होणार का? किंवा अमोल कीर्तिकर विरुद्ध भाजप तगडा उमेदवार किंवा सेलिब्रेटी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

टॅग्स :शिवसेना