Join us  

टीवायबीकॉमची परीक्षा आजपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 5:31 AM

मुंबई विद्यापीठाच्या २०१७-१८ शैक्षणिक वर्षातील वाणिज्य पदवीची तृतीय वर्षाची परीक्षा मंगळवारी, ३ एप्रिलपासून सुरू होत आहे. या परीक्षेस एकूण ७५ हजार ३६० विद्यार्थी असून त्यात ७५:२५ या नव्या पॅटर्नसह

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०१७-१८ शैक्षणिक वर्षातील वाणिज्य पदवीची तृतीय वर्षाची परीक्षा मंगळवारी, ३ एप्रिलपासून सुरू होत आहे. या परीक्षेस एकूण ७५ हजार ३६० विद्यार्थी असून त्यात ७५:२५ या नव्या पॅटर्नसह, ६०:४० या जुन्या पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यांच्या २८४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल. तर राज्याबाहेर सिल्व्हासा या केंद्र्रशासित प्रदेशातील एका परीक्षा केंद्रावरही टीवायबीकॉमची ही परीक्षा होणार आहे. १८ एप्रिलपर्यंत ही परीक्षा चालणार असून त्यात सुमारे ७४ हजार ८०० विद्यार्थी नव्या पॅटर्नसह, तर ५०७ विद्यार्थी जुन्या पॅटर्नने परीक्षा देतील.या परीक्षेसाठी परीक्षा विभागातील हस्तलिखित विभाग, परीक्षा व निकाल विभाग, कॅप विभाग व संगणक विभागातील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी तयारी केली आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी या परीक्षेच्या सज्जतेचा आढावा घेतला. निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील, असा विश्वास घाटुळे यांनी व्यक्त केला. सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले.

टॅग्स :परीक्षामुंबई विद्यापीठ