Join us  

पवईतून दोन कासवांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 2:27 AM

सेफ्टी पिनमुळे एक जखमी : पाळण्यासाठी लहान मुले नेत होती घरी

मुंबई : पवई तलावाजवळ दोन लहान मुलांकडे दोन कासवे आढळून आली. अम्मा केअर फाउंडेशनच्या स्वयंसेविका सविता करलकर यांना त्या दोन मुलांकडे कासवे असल्याचा संशय आला. त्यातील एका कासवाच्या तोंडाला सेफ्टी पिन अडकल्यामुळे जखम झाली होती. सविता यांनी त्वरित पॉज (मुंबई) संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क

करून या जखमी कासवाची माहिती दिली. संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दोन्ही कासवांना ताब्यात घेतले. कासवांना पाळण्यासाठी घरी घेऊन जात आहोत, असे दोन्ही मुलांनी सांगितले. इंडियन सॉफ्टशेल टर्टल या प्रजातीची ही दोन्ही कासवे आहेत. एका कासवाच्या तोंडात सेफ्टी पिन अडकली होती, ती सुखरूपपणे काढण्यात आली. जखमेवर औषधोपचार केले. कासवाच्या तोंडाला कुठलीही खोल जखम किंवा सूज आढळून आली नाही. आता दोन्ही कासवांची प्रकृती स्थिर असून आहारही योग्य पद्धतीने ग्रहण करत आहेत. तसेच दोन्ही कासवांची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे, अशी माहिती पशुचिकित्सक राहुल मेश्राम यांनी दिली.सकाळी बसने अंधेरीहून भांडुपकडे जात असताना दोन मुले काहीतरी संशयास्पद हालचाली करताना दिसून आली. बसमधून उतरून त्यांच्याजवळ गेले, तेव्हा दोन जिवंत कासवे दिसून आली, असे करलकर यांनी सांगितले. यातील एका कासवाच्या तोंडातसेफ्टी पिन अडकलेली आढळून आली. तसेच मुलांकडे मासे पकडण्याचा प्लास्टिकचा गळही सापडला. याच गळामध्ये ही दोन्ही कासवे अडकली होती, असेही त्या म्हणाल्या.पवई तलावातून कासवांची चोरी होऊ नये, यासाठी तलावाच्या परिसरात नियमित गस्त सुरू करण्यासाठी वनविभागाला संस्थेकडून पत्र लिहिले जाणार आहे. इंडियन सॉफ्टशेल टर्टल या प्रजातीचे कासव वन्यजीव संरक्षण कायदा १९७२च्या सूची १ नुसार संरक्षित आहे. त्यामुळे त्यांची शिकार, पाळणे, विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.- सुनीष कुंजू, सचिव, पॉज (मुंबई) संस्था 

टॅग्स :मुंबई