Join us  

मुंबईत तीन महिन्यांत स्वाइनचे दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 5:34 AM

मुंबई : राज्यभरात स्वाइन फ्लूची दहशत कायम असताना आता मुंबईतही स्वाइन फ्लूमुळे दोन बळी गेले आहेत. दक्षिण मुंबईतील दोन ...

मुंबई : राज्यभरात स्वाइन फ्लूची दहशत कायम असताना आता मुंबईतही स्वाइन फ्लूमुळे दोन बळी गेले आहेत. दक्षिण मुंबईतील दोन महिलांचा बळी गेल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. याशिवाय, जानेवारी ते मार्च या दरम्यान शहर-उपनगरात स्वाइन फ्लूचे १३४ रुग्ण आढळून आले आहेत. तरी बदलत्या वातावरणामुळे पसरत चाललेल्या स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळीच सल्ला घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी याविषयी सांगितले की, मार्च महिन्यात आग्रीपाडा येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे, माझगाव येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचाही स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. या महिलेला मधुमेहही होता. आजाराच्या अखेरच्या टप्प्यात स्वाइनचे निदान झाल्यामुळे मृत्यू ओढावला. जानेवारी महिन्यात मुंबईत एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला नाही, मात्र फेब्रुवारी महिन्यात ४०, मार्च महिन्यात ८० आणि एप्रिलच्या पंधरवड्यात १४ रुग्ण आढळल्याची माहिती डॉ. केसकर यांनी दिली.डॉ. केसकर यांनी सांगितले की, स्वाइन फ्लूचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण अधिकाधिक प्रमाणात व्हावे यासाठी सार्वजनिक आरोग्य पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तापमानातील घसरणीमुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंनी डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लू हा इतर सर्वसाधारण फ्लूप्रमाणे आहे. तो लगेच बरा होऊ शकतो. मात्र मूत्रपिंडाचे आजार, स्थूलता, रक्तदाब, मधुमेह या रुग्णांना याची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :स्वाईन फ्लू