मुंबई : अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरियन तस्करांना अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी सात लाखांचे कोकेन हस्तगत केले असून यामध्ये एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अंधेरीतील सहार रोड परिसरातील बामण पाडा या ठिकाणी दोन नायजेरियन नागरिक मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंधेरीच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने या ठिकाणी सापळा रचला होता. काही वेळातच दोन नायजेरियन या ठिकाणी आले. पोलिसांनी तत्काळ झडप घालत त्यांना ताब्यात घेतले.युजेइगवे ओबामी आणि अमोनू अजा अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याजवळ सव्वासात लाख रुपये किमतीचे कोकेन आढळून आले. या तस्करीत आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
सात लाखांच्या कोकेनसह दोन नायजेरियन गजाआड
By admin | Updated: May 10, 2015 04:51 IST