Join us  

पादचारी पूल रखडल्याने दोन जणांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 3:00 AM

जनआंदोलन करण्याचा इशारा : दिड वर्षांपासून काम ठप्प, स्थानिक नागरिक हैराण

मुंबई : कुर्ला येथील रेल्वे पादचारी पुलाचे काम रखडल्याने चार जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पादचारी पुलाचे काम थंडावल्याने प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. प्रवाशांच्या जिवाशी रेल्वे खेळत असल्याची प्रतिक्रिया कुर्ला येथील रहिवाशांनी दिली.

कुर्ला येथील स्वदेशी मिल रोड ते सर्वेश्वर मंदिर रोड यांना जोडणारा रेल्वे रुळावरील पादचारी पुलाचे काम मागील दीड वर्षांपासून रखडले आहे. प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. शनिवारी याच ठिकाणी दोन अनोळखी तरुणांचा अपघाती मृत्यू झाला, तर मागील वर्षी रेल्वे रूळ ओलांडताना विनीत माने, रूपेश साळुंखे या दोन तरुणांचा मृत्यू झाला. २ नोव्हेंबर रोजी दोन जणांचा मृत्यू रेल्वे प्रशासनामुळे झाला. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कुर्लावासीयांकडून करण्यात आली.कंत्राटदाराला पादचारी पुलाची पुनर्बांधणी करण्याची मुदत दिली होती. त्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ करण्यात आली. दीड वर्षे उलटूनदेखील पुलाचे काम झाले नाही. स्थानिक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, रुग्णालय, बाजारपेठेत जाण्यासाठी पूल ओलांडून कुर्ला पश्चिमेकडे जावे लागते. रेल्वे प्रशासनाच्या अंदाधुंदी कारभारामुळे शनिवारी रेल्वे रूळ ओलांडताना दोन जणांचा मृत्यू झाला. मागील दीड वर्षांपासून पादचारी पुलाचे काम सुरू आहे. हे काम युद्धपातळीवर तत्काळ करण्यात यावे, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल. यात कोणतीही दुर्घटना झाल्यास रेल्वे प्रशासनाचे अधिकारी जबाबदार असतील, अशी प्रतिक्रिया रेल यात्री परिषदेचे मुंबई उपाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :मुंबई