Join us

‘फिल्मी स्टाईल’ने दोन चोरांना अटक

By admin | Updated: November 28, 2015 01:33 IST

चक्क फिल्मी स्टाईलने माथाडी कामगारांसारखी वेशभूषा करून रेल्वे पोलिसांनी सीएसटी स्थानकातून सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन चोरांना शिताफीने

मुंबई : चक्क फिल्मी स्टाईलने माथाडी कामगारांसारखी वेशभूषा करून रेल्वे पोलिसांनी सीएसटी स्थानकातून सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन चोरांना शिताफीने रे रोड येथून अटक केली. आरोपींकडून ६७ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. भार्इंदर येथे राहणारे सोन्याचे व्यापारी प्रदीप पोरवाल यांनी ४ आॅक्टोबर रोजी लखनौला जाण्यासाठी सकाळी ७.४0 वाजण्याच्या सुमारास सीएसटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वरून पुष्पक एक्स्प्रेस पकडली. यावेळी पोरवाल यांच्याकडे असलेल्या बॅगेत ५,१९९ ग्रॅम ६६0 मिलीग्रॅम वजनाचे सुमारे एक कोटी अठरा हजार किमतीचे सोन्याचे दागिने होते. पोरवाल हे बोगी नंबर एस १0 मध्ये बसले असता त्यांची नजर चुकवून चोरांनी बॅग लंपास केली. पोरवाल यांनी सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्यात दागिन्यांच्या चोरीची तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि पोलीस निरीक्षक धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. पुढील तपासात पोलिसांना खबऱ्यांमार्फत गुन्ह्यातील आरोपी हे रे रोडमधील नगीना हॉटेल दारुखाना येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करून आरोपींना अटक करण्याची व्यूहरचना आखली आणि त्यासाठी माथाडी कामगारांप्रमाणे वेषांतरही केले. गुन्ह्यातील आरोपी अमरचंद चौहान आणि वसीउल्ला अन्सारी हे दोघे हॉटेलजवळ येताच पोलिसांनी पकडले. आरोपी अन्सारीकडून चोरलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी मंगळसूत्र, बांगड्या, कानातील टॉप्स व अंगठ्या असे ६७ लाख ५८ हजार ८२९ रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. चोरी केलेले अन्य दागिने आरोपींनी कुठे ठेवले याचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत. या चोरीमागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)