Join us  

शिवाजी पार्क नूतनीकरण प्रकल्पात दोन कोटींची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 2:43 AM

मुंबई  : शेकडो खेळाडूंना घडविणाऱ्या दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कचा महापालिका कायापालट करणार आहे. या मैदानावर केवळ क्रिकेट नव्हे, ...

मुंबई  : शेकडो खेळाडूंना घडविणाऱ्या दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कचा महापालिका कायापालट करणार आहे. या मैदानावर केवळ क्रिकेट नव्हे, तर जॉगिंग, सायकल ट्रॅक, फुटबॉल, स्केटिंग, अशा खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, आता या प्रकल्पाच्या खर्चात दोन कोटींची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे धूळमुक्त आणि हिरवेगार शिवाजी पार्क तयार करण्यावरच आता भर देण्यात येणार आहे.

शिवाजी पार्कवर राजकीय सभा, विविध खेळ, सार्वजनिक कार्यक्रम होत असतात. ज्येष्ठ नागरिक येथे नियमित फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र, या मैदानावरील धुळीचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिक पालिकेकडे अनेक वेळा करीत आहेत. हा त्रास टाळण्यासाठी पाण्याचा शिडकाव करणारे यंत्र येथे बसवले; परंतु पुरेशा पाण्याअभावी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे धूळमुक्त शिवाजी पार्क आणि विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आला. 

या प्रकल्पासाठी सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ चार कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे फुटबॉल, दोन बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग, खो-खो, कबड्डी आदीचे कोर्ट, जॉगर्स ट्रॅक, नानानानी पार्क, अशा काही योजनांमध्ये कपात करण्यात आली आहे. त्याऐवजी आता शिवाजी पार्क परिसर हिरवागार व धूळमुक्त ठेवण्यासाठी पाण्याचा शिडकावा करणारे यंत्र आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केली जाणार आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका