मुंबई : दलालांकडून तिकिटांमध्ये केला जाणारा गैरव्यवहार पाहता तो रोखण्यासाठी १२0 दिवस अगोदर तिकिटाचे आरक्षण करण्याचा निर्णय रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आला. १ एप्रिलपासून आरक्षणाच्या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. याआधी तिकीट आरक्षण करण्यासाठी ६0 दिवस अगोदर आरक्षणाची अट घालण्यात आली होती. नव्या आरक्षण नियमांची अंमलबजावणी सध्यातरी ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस आणि विशेष ट्रेनमध्ये होणार नसल्याचे सांगण्यात आले. या फक्त काही वेळेलाच धावणाऱ्या ट्रेन असून, आरक्षणाचा नवा नियम हा नियमित धावणाऱ्या ट्रेनसाठी आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सेवेसाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात १३८ या नवीन हेल्पलाइन नंबरचीही घोषणा करण्यात आली. मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी हा हेल्पलाइन नंबर प्रवाशांना उपलब्ध होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या हेल्पलाइन नंबरवर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, कॅटरिंग, कोच संबंधित माहिती मिळेल. सध्या सुरक्षेसाठी भारतीय हेल्पलाइन नंबर १८२ तर पीएनआर, सीट उपलब्धता, तिकीट शुल्क तसेच ट्रेनच्या सद्य:स्थितीबद्दल १३९ नंबर उपलब्ध आहे.
दोन घोषणांची अंमलबजावणी होणार
By admin | Updated: March 4, 2015 02:09 IST