राज्य सरकारविरुद्ध रणशिंग फुंकणार, खडसे झाले सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 05:47 AM2020-02-16T05:47:58+5:302020-02-16T05:48:39+5:30

भाजप कार्यकारिणीत निर्धार। ठाकरे सरकारवर विश्वासघाताचा आरोप

The trumpet blows against the state government; | राज्य सरकारविरुद्ध रणशिंग फुंकणार, खडसे झाले सक्रिय

राज्य सरकारविरुद्ध रणशिंग फुंकणार, खडसे झाले सक्रिय

Next

नामदेव मोरे 
नवी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने जनतेचा, हिंदुत्वाचा आणि महाराष्ट्राचा विश्वासघात केला असल्याचा ठपका भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या येथील बैठकीत शनिवारी ठेवण्यात आला. या विश्वासघाता विरुद्ध विविध प्रकारे आंदोलन करण्यात येणार असून त्याची घोषणा रविवारच्या खुल्या अधिवेशनात करण्यात येणार आहे.

भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक आणि खुले अधिवेशन शनिवारपासून नेरूळमधील तेरणा महाविद्यालयात सुरू झाले. आज प्रदेश कार्यकारिणी, विस्तारक, कोअर कमिटी यांच्या बैठकी झाल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे राज्यातील सर्व मोठे यावेळी उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीत दोन राजकीय ठराव मंजूर करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मोदी सरकार आणि फडणवीस सरकारची कामगिरी सांगून मते मागितली व निवडणुकीनंतर काँग्रेसी विचारांशी हातमिळवणी केली हा जनादेशाचा अनादर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेसकडून होत असलेला अपमान मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासामुळे सहन केला जात आहे. हा अपमान सहन करणे म्हणजे सावरकरांच्या जाज्वल्य विचारांशी विश्वासघातच आहे. व्होटबँकेच्या राजकारणासाठी काँग्रेसचा सीएएला विरोध आहे आणि मुख्यमंत्री पदाच्या लोभामुळे शिवसेना काँग्रेसची नाराजी ओढवून घेऊ शकत नाही, ही डळमळीत व हिंदुत्वाचा घात करणारी भूमिका असल्याची टीका ठरावात करण्यात आली आहे.
शेतकरी कर्जमाफीची देवेंद्र फडणवीस सरकारची चांगली योजना बंद केली आणि नवीन सुरूच केली नाही हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. तीन पक्षांची तोंडे तीन दिशांना असून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचेही या ठरावात म्हटले आहे.
या सर्व मुद्यांवर व्यापक आंदोलनाची घोषणा उद्याच्या अधिवेशनात केली जाईल, अशी माहिती माजी मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांना दिली.

पंतप्रधानांचे अभिनंदन
राष्ट्रीय हिताच्या मुद्यांबाबत दिलेल्या वचनांची पूर्तता केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याचा ठरावही उद्याच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
सीएए, एनपीआरबाबत मुस्लिम, आदिवासी, भटके, दलितांमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार कार्यकारिणीने केला. तसेच भाजप आरक्षण संपवणार हा भ्रम पसरविला जात असून त्याविरुद्धही जनजागृती करण्याचे ठरले.

सत्तापक्षाचं जॅकेट काढा, विरोधी
पक्षाचं घाला
राज्यात सत्तांतर होणार असे भाजपचे काही नेते ठामपणे सांगत असताना माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत, ‘गेली पाच वर्षे घातलेलं सत्तापक्षाचं जॅकेट काढा आणि विरोधी पक्षाचं जॅकेट घाला’ असा सल्ला दिला. राजकारण केव्हाही बदलू शकतो पण आज आमच्यावर जबाबदार विरोधी पक्षाची जबाबदारी आहे, ती पूर्ण ताकदीने निभवा, असे ते म्हणाले.

सरकारने शेतकऱ्यांना फसविले
- चंद्रकांत पाटील
भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर टीका केली. कर्जमाफीची फसवी घोषणा करण्यात आली. शेतकºयांना पूर्णपणे फसविले असून
त्यांचा बेगडी व दुटप्पीपणा जनतेसमोर उघड करणार
आहे. सरकारविरोधातील
रणनीती अधिवेशनात निश्चित करणार असल्याचेही त्यांनी
स्पष्ट केले.

खडसे झाले सक्रिय : या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसले. त्यांनी सीएए, एनआरसी आदीबाबत भाषणही दिले. बाहेर पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मी पक्षावर कधीच नाराज नव्हतो. पक्षावर टीका केलेली नव्हती. काही व्यक्तींवर टीका असू शकते.


मनसेबरोबर युती नाही : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलला असल्याबद्दल त्यांचे स्वागत; परंतु जोपर्यंत ते परप्रांतीयांविषयी भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याबरोबर युती शक्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विनोद तावडे यांनीही महापालिका निवडणुकांमध्ये मनसेबरोबर युती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: The trumpet blows against the state government;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.