ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९! 'टेरेस'वरच पिकवा केळी; दीड महिन्यात तयार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:36 IST2025-12-02T10:35:28+5:302025-12-02T10:36:56+5:30
भाभा अणुसंशोधन केंद्राने देशातील पहिले उत्परिवर्तित केळीचे वाण 'ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९' विकसित केले आहे. केंद्र सरकारने कावेरी वामन हे नाव या वाणाला दिले आहे.

ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९! 'टेरेस'वरच पिकवा केळी; दीड महिन्यात तयार!
मुंबई : भाभा अणुसंशोधन केंद्राने देशातील पहिले उत्परिवर्तित केळीचे वाण 'ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९' विकसित केले आहे. केंद्र सरकारने कावेरी वामन हे नाव या वाणाला दिले आहे. हे वाण जास्त घनतेच्या लागवडीसाठी आणि टेरेस गार्डनिंगसाठीही उपयुक्त आहे. यामुळे व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांसाठी हे वाण आधार देणारे ठरणार आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारितील तिरुचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या सहकार्याने कावेरी वामन ही जात विकसित करण्यात आली आहे. वाणाचे उत्पादन ग्रांडे नैन या प्रकारांतर्गत घेतले गॅमा गेले. याअंतर्गत उपयुक्त उत्परिवर्तन घडवून आणण्यासाठी किरणोत्सर्गाचा वापर केला होता.
अनेक वर्षे चाचण्यांनंतर टीबीएम-९ हा घटक निवडला गेला होता. भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन यांनी सांगितले की, जास्त प्रमाणात लागवड केल्या जाणाऱ्या ग्रांडे नैन केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल, तर अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी सांगितले, बागायती पिकांच्या सुधारणेत क्रांतीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित करून प्रत्यक्षात जारी केलेले हे पहिले फळ पीक ठरले आहे. आता संस्थेकडील सुधारित पिकांच्या एकूण वाणांची संख्या ७२ झाली आहे. मूळ वाणापेक्षा दीड महिने लवकर परिपक्व होते.
केळीचे झाड उंच असल्यास, विशेषतः वादळी किनारपट्टीच्या प्रदेशात असल्यास ते जमिनीवर लोळण घेणे ही एक सामान्य समस्या बनते.
कावेरी वामन हे वाण आखूड उंचीचे असून, यामुळे ते जमिनीवर लोळण घेत नाही हा याचा फायदा आहे. आखूड उंचीचे असल्याने त्याला लाकडी किंवा बांबूच्या आधाराची गरज नाही. लागवडीचा खर्चही कमी होतो. या फळामध्ये चव व गुणवत्ताविषयक वैशिष्ट्ये कायम आहेत.