Join us  

शिक्षणमंत्र्यांच्या प्रभागातील आदिवासी पाडे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 5:47 AM

बोरीवली (प.) खाडीपलीकडील गोराई गावाच्या लगत असलेले आदिवासी पाडे आजही अंधारातच आहेत

मनोहर कुंभेजकर मुंबई : बोरीवली (प.) खाडीपलीकडील गोराई गावाच्या लगत असलेले आदिवासी पाडे आजही अंधारातच आहेत. विशेष म्हणजे हे आदिवासी पाडे भाजपाच्या उत्तन येथील केशवसृष्टीपासून फक्त १५ किमी अंतरावर आहेत, तर मुंबईपासून ३५ किमी अंतरावर आहेत. शिक्षणमंत्री व उपनगराचे पालक मंत्री विनोद तावडे यांच्या मतदारसंघातील गोराईत हे आदिवासी पाडे मोडतात.दीड ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या या सहा आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर गेली ७१ वर्षे वीज नाही. भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गावागावांत व घराघरांत वीज दिल्याचा दावा फोल आहे, असे मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीसांगितले.संजय निरुपम व माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी येथील आदिवासी पाड्यांना नुकतीच भेट दिली. ‘भाजपा सरकार खोटी आश्वासने देत असून, फक्त जाहिरातबाजी करीत आहे. संपूर्ण देशातील घराघरांत १०० टक्के वीज पोहोचली आहे; परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यापासून जामझाडपाडा हा आदिवासी पाडा अवघ्या ३५ किमी अंतरावर आहे. येथे वीज अजिबात नाही. ते अनेक वर्षे संघर्ष करीत आहेत. त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. गेली चार वर्षे यांची सत्ता असून काहीच फायदा गरीब आणि आदिवासी यांना होत नाही,’ असा आरोप संजय निरुपम यांनी केला.आश्वासने विरली हवेतच!आम्हाला वीज काय कुठे आहे माहीत नाही, कधी आम्ही वीज बघितली नाही. निवडणुकीपूर्वी सहा महिन्यांत तुमच्याकडे वीज येईल, असे आश्वासन राजकीय पक्ष देतात. मात्र निवडणूक झाल्यावर ही आश्वासने हवेत विरतात, असे गोराई गावातील जमझाडापाडा या आदिवासी पाड्यातील एका वृद्ध महिलेने सांगितले.गोराई गावात जमझाडपाडा, बाभरपाडा, हौदपाडा, छोटी डोंगरी, मोठी डोंगरी, मुंडा पाडा हे सहा आदिवासी पाडे आहेत. येथे वीज नसल्यामुळे परिसरातील मुले दिव्याखाली अभ्यास करतात. वर्षानुवर्षे येथे लोक अंधारात आयुष्य काढत आहेत.देशाच्या आर्थिक राजधानीतील आदिवासी पाड्यात अजून वीज पोहोचली नाही. हे आदिवासी पाडे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि भाजपाचे कॅबिनेट मंत्री विनोद तावडे यांच्या मतदारसंघात मोडतात. गेल्या साडे तीन वर्षांत मंत्री एकदाही येथे आले नसल्याचा आरोप शिवानंद शेट्टी यांनी केला.