लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या पदवी प्रवेशासाठीच्या तिन्ही गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या असून, बारावीच्या वाढलेल्या निकालाचा परिणाम या याद्यांवर दिसून आला. ३ गुणवत्ता याद्या जाहीर होऊनही नामांकित महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये फारशी घसरण न झाल्याने ८० ते ८५ टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही पसंतीच्या महाविद्यालयांत प्रवेश न झाल्याने हिरमोड झाल्याचे दिसून आले. यंदाही पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षाही विद्यार्थ्यांनी स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना पसंती दिल्याने त्यांचे कट ऑफ नव्वदीपार स्थरावल्याचे दिसून आले.
ज्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रवेश गुणवत्ता याद्यांतून होऊ शकले नाहीत त्यांना आता महाविद्यालयीन स्तरावर जेथे रिक्त जागा उपलब्ध आहेत. तेथे प्रवेश घेऊन समाधान मानावे लागणार आहे. अंतर्गत मूल्यमापनामुळे यंदा बारावीच्या निकालात मागील वर्षीपेक्षा वाढ झालीच, मात्र पहिल्या गुणवत्ता यादीतच कट ऑफ ९८ टक्क्यांवर पोहोचल्याने पुढील याद्यांत तो घसरण्याची शक्यता खूप कमी असल्याचे भाकीत अभ्यासकांनी आधीच व्यक्त केले होते.
काही ठिकाणी जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशी परिस्थितीही उद्भवू शकते अशी परिस्थिती असल्याने उच्च व तंत्रशिक्षण संचलनालयाकडून आवश्यकतेप्रमाणे तुकडीवाढीसाठीही परवानगी देण्यात आली. दरम्यान, पहिल्या २ याद्यांत जागा फुल्ल झाल्याने सेंट झेविअर्समध्ये शेवटच्या यादीदरम्यान तुकडी वाढ करूनही कला आणि बीएमएम अभ्यासक्रमाचा कट ऑफ नव्वदीपारच राहिला.
विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्ये घसरण
पारंपरिक अभ्यासक्रमात कला शाखेचा कट ऑफ सगळ्यात वरचढ राहिला तर विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्ये काही महाविद्यालयांत बरीच घसरण दिसून आली. सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा की परीक्षेची वाट पाहावी या द्विधा मनःस्थितीत अनेक विद्यार्थी आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्ये घसरण दिसून आली.
वाणिज्य शाखेकडे कल
याउलट कोविड काळानंतर स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा विशेष कल दिसून आला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीपासून अकाउंट अँड फायनान्स, बँकिंग अँड इंश्युरन्स, फायनान्शिअल मॅनेजमेंट यांसारख्या तसेच बीएमएससारख्या अभ्यासक्रमांनी आपला कट ऑफ तिसऱ्या यादीपर्यंत कायम ठेवला तर काही ठिकाणी त्यात ३ ते ४ टक्क्यांची घसरण दिसून आली.
सर्व नामांकित महाविद्यालयांतील बीएमएस अभ्यासक्रमाच्या जागांना विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे. यंदाच्या वर्षीही विद्यार्थ्यांचा ओढा या अभ्यासक्रमांकडे अधिक असल्याचे प्राचार्य सांगतात. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशात मोठी स्पर्धा होती, असे अभ्यासक अधोरेखित करत आहेत.