Join us  

इविंग्ज सार्कोमा या दुर्मीळ कर्करोग झालेल्या चिमुरड्यावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 2:35 AM

इराकी रहिवासी असणाऱ्या आठ वर्षांच्या जुनेद (नाव बदललेले) याला इविंग्ज सार्कोमा हा हाडांचा दुर्मीळ कर्करोग झाल्याचे निदान झाले.

मुंबई : इराकी रहिवासी असणाऱ्या आठ वर्षांच्या जुनेद (नाव बदललेले) याला इविंग्ज सार्कोमा हा हाडांचा दुर्मीळ कर्करोग झाल्याचे निदान झाले. हाडांमध्ये आणि त्याभोवती होणारा हा कर्करोग लहान मुलांमध्ये दिसून येतो. यावर स्थानिक पातळीवर उपचार सुरू झाले, मात्र योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर त्या रुग्णाला मुलुंड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.या रुग्णालयात कर्करोगाचा विळखा बसलेले ते हाड शस्त्रक्रियेच्या माध्यमातून यशस्वीरीत्या काढण्यात आले. त्यानंतर त्या ठिकाणी मेटॅलिक इम्प्लांट्स करण्यात आले. आता रुग्णाने कर्करोगावर नियंत्रण मिळविले असून त्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.आॅर्थोपिडिक आॅकोसर्जन डॉ. हरेश मंगलानी आणि रेडिएशन आॅन्कोलॉजिस्ट डॉ. रूपल चढ्ढा यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णावर उपचार सुरू होते. या डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या पायातील हाड शरीराबाहेर काढले. त्या हाडाला उच्चस्तरीय रेडिएशन देऊन उपचार केले जातात किंवा प्रभावित भाग काढून टाकला जातो.रेडिएशन्स पूर्ण झाल्यानंतर मेटॅलिक इम्प्लांट्सच्या मदतीने हाड पूर्वी ज्या जागी होते, तेथे पुन्हा बसवले जाते. आठ तासांच्या शस्त्रक्रियात्मक प्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पायातून १५ सेंटीमीटर भाग काढण्यात आला. रेडिएशनचा उच्च डोस त्या हाडाला रेडिओथेरपी विभागात सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ देण्यात आला. त्यानंतर हे हाड पुन्हा त्याच्या पायाच्या नळीत बसवण्यात आले.याविषयी डॉ. मंगलानी यांनी सांगितले की, अशा प्रकरणांत रेडिएशनचा मोठा डोस दिला जात असल्याने कर्करोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाहीशी होते.त्याचप्रमाणे मेगा एण्डोप्रोस्थेसिस अपयशी ठरण्याची समस्या यात येत नाही. रुग्णाची प्रकृती आता चांगली आहे. त्याला सहा महिन्यांनी तपासणीसाठी यावे लागेल.

टॅग्स :हॉस्पिटल