भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरातील एकमेव गोड्या पाण्याची चेना नदी केवळ पावसाळ्यात दुथडी भरुन वाहते. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांचे ती नेहमीच आकर्षण ठरत आहे. हि नदी पोहण्यासाठी धोकादायक असल्याने २००६ पासुन या नदीने ३९ जणांचा बळी घेतल्याने हि नदी पावसाळी सहलींचे जीवघेणे ठिकाणच म्हणून ओळखली जात आहे. सध्या या नदीच्या पात्रात महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीरपणे माती भराव होत असल्याने तीचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. घोडबंदर मार्गावरील चेना गावात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसरातून वाहणाऱ्या पाण्यातून चेना नदीचा प्रवाह तयार झाला आहे. शहरातील गोड्या पाण्याची एकमेव नदी भार्इंदर खाडीत विसावते. पावसाळ्यात दुधडी भरुन वाहणाऱ्या या नदीच्या मोहात अनेक पर्यटक पडत असतात. येथील हिरवळ व शुद्ध हवेतील गारवा ऐन पावसाळ्यात अंगावर घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी गावातील ग्रामस्थ विनंतीनुसार खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. या नदीचे पात्र जास्त खोल नसले तरी तीचा जलयुक्त किनारा मात्र चिखलमय असल्याने त्यात पोहणे धोकादायक ठरते. तशा पूर्वसूचना येथील ग्रामस्थ पर्यटकांना देत असले तरी एखाद्या उत्साहीत पर्यटकाला नदीच्या किनाऱ्यासह पात्रातील चिखलाचा अंदाज येत नसल्याने पोहणे त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. सन २००६ पासून या नदीत ३९ जणांनी जीव गमावला आहे. नदी धोकादायक असतानाही येथे पर्यटकांच्या संरक्षणासाठी एकही जीवरक्षक येथे तैनात नाही. त्यामुळे सर्व मदार ग्रामस्थांवर अवलंबून असली तरी निसर्ग आनंदासह तेथील शांततेची लयलूट करण्यासाठी येणाय््राा पर्यटकांना मात्र हे ठिकाण एकदिवसीय सहलीसाठी योग्य असल्याचे स्थानिकांकडुन सांगण्यात येत आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे येथील स्थानिकांना तात्पुरता रोजगार मिळतो. स्थानिकांसह राष्ट्रीय उद्यानातील पशु-पक्षांना या नदीत बारामाही पाण्याची सोय उपलब्ध असल्याने येथील हिरवळीत खंड पडत नाही. परंतु, या नदीच्या पात्रावर भूमाफीयांची वक्रदृष्टी पडल्याने महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने पात्रात बेकायदेशीर माती भराव करणे सुरु झाले आहे. त्यावर घोडबंदर मंडळ कार्यालयाने केवळ पंचनामा करुन त्याचा अहवाल वरीष्ठांना पाठविला आहे.
पर्यटकांनो सावधान! चेनाने आतापर्यंत घेतले ३९ बळी
By admin | Updated: June 29, 2015 04:44 IST