Join us  

परदेशात जाण्यापूर्वी प्रशिक्षण अत्यावश्यक, दूतावास २४ तास सज्ज राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 3:58 AM

जगभरातून भारतीय कामगार आणि श्रमिकांना मोठी मागणी आहे. रोजगारासाठी परदेशात गेलेल्या भारतीयांचे शोषण होवू नये, त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण व्हावे यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे.

मुंबई : जगभरातून भारतीय कामगार आणि श्रमिकांना मोठी मागणी आहे. रोजगारासाठी परदेशात गेलेल्या भारतीयांचे शोषण होवू नये, त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण व्हावे यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे. परदेशात जाण्यापूर्वी प्रशिक्षण देणे आणि परदेशात गेल्यानंतर दूतावासामार्फत २४ तास या भारतीयांसाठी सज्ज राहण्याचे धोरण भारत सरकारने स्वीकारले आहे, असे प्रतिपादन विदेश मंत्रालयाच्या पासपोर्ट, व्हिसा आणि प्रवासी कार्य विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी रविवारी केले.मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील विदेश भवनात आयोजित कार्यक्रमात मुळे बोलत होते. रोजगारासाठी परदेशी जाणा-या भारतीयांसाठी १५ दिवसांच्या ‘प्रस्थानपूर्व प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले होते. देशातील या पहिल्यावाहिल्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. ते म्हणाले की, जगभरातून भारतीय कामगारांना मोठी मागणी आहे. आजमितीला तीन करोड भारतीय विदेशात रोजगारासाठी वास्तव्य करत आहेत. एकट्या आखाती देशांमध्ये ही संख्या ८५ लाखांच्या घरात आहे. यात दरवर्षी ७ ते ८ लाखांची भर पडते. रोजगारासाठी परदेशात जाणा-यांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा ज्या देशात जातो तेथील संस्कृती, सामाजिक चालीरिती वेगळ्या, धर्म यासंदर्भातील अज्ञानामुळे कारावासही भोगावा लागतो. विविध कारणांमुळे कारावास, नोकरीच्या करारातील बदल, व्हिसाच्या समस्या अशा विविध अडचणींचा अभ्यास करून विदेश मंत्रालयाने सर्वंकष प्रशिक्षण कार्यक्रम आखल्याचे मुळे यांनी सांगितले. भारतीय दूतावासांनाही भारतीयांच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी सजग राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना या विषयी प्रशिक्षित करण्यात आले आहे. ऐनवेळी भारतीयांच्या समस्या सोडवता याव्यात यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून ते खर्चण्याचे अधिकारही स्थानिक पातळीवरील अधिका-यांना बहाल करण्यात आल्याचे मुळे यांनी सांगितले. परदेशात जाण्यापुर्वीच प्रशिक्षण घेतल्यास अडचणींपासून लांब राहणे शक्य आहे, असेही ते म्हणाले़