Join us  

आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण; ९०० लोकांना दिले मुंबई पालिकेने ऑनलाइन धडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:22 AM

जागतिक आपत्ती जोखीम घट दिन:

मुंबई : आपत्ती काळात प्रसंगावधान व सतर्कता राखल्यास आपल्यासह अनेकांचे प्राण वाचू शकतात. मात्र संकटकाळात आपल्या बचावासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत बहुतांश नागरिक अनभिज्ञ असतात. त्यामुळे ‘जागतिक आपत्ती जोखीम घट दिना’चे औचित्य साधून आपत्ती व्यवस्थापनाबाबत ९०० लोकांना महापालिकेने नुकतेच ऑनलाइन प्रशिक्षण दिले.

परळ येथील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन जागतिक आपत्ती जोखीम घट दिनानिमित्त १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. भारती विद्यापीठाच्या परिचारिका महाविद्यालयातील १५० विद्यार्थी व शिक्षक, पालिका शाळांमधील ८२ शिक्षक व ३१८ विद्यार्थी, अशा ३९९ प्रशिक्षणार्थींनी दोन कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. तर तिसºया कार्यशाळेत ‘टेक महिंद्रा फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित ३०० व्यक्तींनी सहभाग घेतला.

या प्रशिक्षण कार्यशाळांच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व आणि गरज याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सुमारे ८५० प्रशिक्षणार्थींनी ‘ऑनलाइन’ पद्धतीने, तर ४० प्रशिक्षणार्थींनी थेट पद्धतीने सहभाग नोंदविला, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली. तर  ‘बी’ विभागात परंपरिक पद्धतीने आयोजित थेट प्रशिक्षणामध्ये ४० प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. 

काय करावे - काय करू नये याचे दिले जाते प्रशिक्षण

आपत्ती व्यवस्थापनविषयक विविध बाबींची माहिती दिली जाते. यात प्रामुख्याने आपत्ती म्हणजे काय, आपत्ती व्यवस्थापन व त्याची आवश्यकता, आपत्ती व्यवस्थापनात महापालिकेची भूमिका, आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे व काय करू नये, यासारख्या बाबींचा समावेश होता. याच प्रशिक्षणांचा भाग म्हणून प्रात्यक्षिकविषयक ॲॅनिमेशन फिल्मचे प्रसारणही प्रशिक्षणांदरम्यान करण्यात आले. या कार्यशाळांना आपत्कालीन व्यवस्थापन खात्यातील प्रशिक्षणविषयक सत्रप्रमुख राजेंद्र लोखंडे यांनी प्रामुख्याने प्रशिक्षण दिले.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका