Join us  

एक मार्ग बंद केल्याने वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 2:40 AM

कुर्ला-अंधेरी रोड : फेरीवाल्यांचाही होतोय अडथळा; ठोस उपाययोजनांची मागणी

मुंबई : उपनगरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी कुर्ला-अंधेरी रोड हादेखील प्रचंड वाहतूककोंडीचा मार्ग म्हणून ओळखला जातो़ सद्य:स्थितीमध्ये सकाळ आणि सायंकाळ या वेळेत या मार्गावर वाहनचालकांना मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागते. महत्त्वाचे म्हणजे येथील बंद करण्यात आलेल्या काळे मार्गामुळे एलबीएससह मगन नथुराम मार्गावरील वाहनांच्या संख्येत भर पडली आहे. वाहतुकीचे तीनतेरा वाजले असून, रात्री १२ वाजताही हा मार्ग कोंडीत सापडल्याचे निदर्शनास येते.

कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे रिक्षा वेड्यावाकड्या लागलेल्या असतात. येथूनच वाहतुकीस अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होते. कुर्ला मार्केट परिसरात फेरीवाल्यांनी रस्त्यालगत बस्तान बसविल्याने वाहनांना पुरेशी जागा नसते. कुर्ला डेपो परिसरात सिग्नलनजीक वाहने कशीही, केव्हाही वेडीवाकडी हाकली जात असल्याने दिवसभर या सिग्नल परिसरात चक्का जाम असतो. कल्पना सिनेमागृह येथे रस्त्यालगत उभी करण्यात आलेली वाहने, फेरीवाले आणि रस्त्याची झालेली चाळण वाहतुकीचा वेग कमी करते.एलबीएस मार्गावर मायकल शाळेजवळ हाती घेण्यात आलेल्या रस्त्याच्या कामामुळे एकावेळी एकच वाहन मार्गक्रमण करू शकते, अशी अवस्था आहे.कुर्ला-अंधेरी मार्गाचा दुवा असलेला काळे मार्गावरील कमानी ते बैलबाजार हा एक मार्ग बंद करण्यात आला आहे. येथील दुरुस्तीचे कारण पुढे करीत बंद करण्यात आलेला हा एकदिशा मार्ग वर्ष उलटले तरी सुरू करण्यात आलेला नाही. परिणामी, कमानीहून एलबीएसमार्गे वाहनांना मगन नथुराम मार्गाने बैलबाजार, साकीनाका गाठावे लागते. हे करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. कारण एलबीएसवरून मगन नथुराम मार्गावर अशोक लेलँड येथे वळण घेताना वाहनचालकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. मुळात हे वळण अवघड असल्याने त्यास वेळ लागतो. याच वेळेत वाहनांच्या एकामागोमाग एक रांगा लागलेल्या असतात.काळे मार्गावरील वाहने एलबीएसवर आल्याने त्यांचा येथील भार वाढतो. वाहनांची संख्या वाढते. शिवाय वेळ वाया जातो. महत्त्वाचे म्हणजे मगन नथुराम मार्गावरील वाहनांच्या संख्येत भर पडल्याने येथील वाहतूककोंडीही वाढते. परिणामी, हा रस्ता सायंकाळी वाहतूककोंडीने भरलेला असतो. येथून पुढे जरीमरी येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृतरीत्या वाहने उभी केलेली असतात. त्याचा फटका वाहनचालकांना बसतो.

 

टॅग्स :मुंबईरस्ते सुरक्षा