Join us  

मंगेशकर कुटुंबीयांना सामाजिक दायित्वाची परंपरा- मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 6:01 AM

आपण मोठे झालो तरी नम्रता कायम राखणे गरजेचे असल्याचे मांडले मत

मुंबई : मंगेशकर कुटुंबीयांना जशी सांगीतिक सेवेची परंपरा आहे तशीच देशभक्तीची परंपरा आहे. गेली अनेक वर्षे मंगेशकर कुटुंबीयांनी सामाजिक दायित्वाची परंपराही कायम राखली आहे, ही बाब वाखाणण्याजोगी आहे. फक्त गुणवान असून उपयोग नाही, तर आपण दुसऱ्यासाठी उपयोगी पडलो पाहिजे. देश आणि समाज पुढे जाण्यासाठी आपण त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे; आणि मंगेशकर कुटुंबीय कायम त्या भावनेने बांधिलकी राखत आहे याचा आनंद असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कारांचे वितरण बुधवारी संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात पार पडले, त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून भागवत बोलत होते. ते पुढे म्हणाले, या सोहळ्यातील विजेत्यांनी आपल्या पुरस्काराचे श्रेय स्वत:पुरते मर्यादित न ठेवता शिष्य, कुटुंबीय आणि सर्वांना दिले. त्याचप्रमाणे देशालाही हे श्रेय दिले. या भावनेतूनच समाज आणि देश पुढे जात असतो. आपल्या कामाने देश मोठा झाला पाहिजे, आपण मोठे झालो तरी नम्रता कायम राखली पाहिजे. हीच नम्रता आपल्या जवानांकडे आहे, सीमेवर ते अविरतपणे लढत असतात, वेळ येते तेव्हा प्राणही देतात, मात्र अखेरपर्यंत कर्तव्य बजावतात.या सोहळ्यात मोहन भागवत यांच्या हस्ते पटकथा लेखक सलीम खान यांना सिनेसृष्टीतील योगदानासाठी ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेत्री हेलन, दिग्दर्शक मधुर भंडारकर, नृत्यांगना सुचेता भिडे-चाफेकर यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तर ‘वाग्विलासीनी’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक वसंत डहाके यांना घोषित करण्यात आला होता, त्यांच्या वतीने डहाके यांचा नातू बिल्व डहाके याने हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी रंगमंचावर डहाके यांच्या कन्या राही डहाके उपस्थित होत्या. तालयोगी आश्रम या संस्थेला ‘आनंदमयी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे पं. सुरेश तळवलकर यांनी स्वीकारला. गेल्या वर्षातील उत्कृष्ट नाट्यकृती म्हणून ‘मोहन वाघ’ पुरस्काराने भद्रकाली निर्मित ‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी प्रसाद कांबळी यांनी पुरस्कार स्वीकारला. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप १ लाख १ हजार १०१ रुपये आणि मानचिन्ह असे आहे. या सोहळ्याला पं. हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. सलीम खान म्हणाले, मंगेशकर कुटुंबीयांना सरस्वतीचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यांंचा कृतज्ञ आहे. लतादीदींना प्रदीर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा आहे. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक वसंत डहाके यांची कन्या राही यांनी डहाके यांचा संदेश उपस्थितांसमोर वाचून दाखविला. त्यात त्यांनी म्हटले होते की, सर्वांना निरामय आणि भयमुक्त जगता यावे आणि सर्वत्र सूर आणि शब्दांचा स्वतंत्र आविष्कार व्हावा ही इच्छा आहे.सामान्यांनी जवानांना दिले २२५ कोटीशहिदांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून प्रतिष्ठानच्या आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने १ कोटी १८ लाख रुपयांची मदत सीआरपीएफचे डायरेक्टोरेट जनरल विजयकुमार यांना सुपुर्द करण्यात आली. केंद्रीय गृह विभाग आणि अभिनेता अक्षय कुमार यांची संयुक्तरीत्या संकल्पना असलेल्या या संकेतस्थळाचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सीआरपीएफचे डायरेक्टोरेट जनरल विजयकुमार यांनी स्वीकारला. या वेळी मनोगत व्यक्त करताना विजयकुमार यांनी सांगितले की, पुलवामा हल्ल्यानंतर ‘भारत के वीर’ या संकेतस्थळावर दीड महिन्यात सामान्यांनी २२५ कोटी रुपये जमा केले आहेत. यात देश-विदेशातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे, ही लष्करासाठी अभिमानास्पद बाब आहे.

टॅग्स :मोहन भागवत