Join us  

टॉवरसाठी केलेले खोदकाम एसआरए इमारतीच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 1:23 AM

कुरार व्हिलेजमधील रहिवाशांचा आरोप; अग्निशमन दलाकडून घरे रिकामी करण्याचा इशारा

- गौरी टेंबकर-कलगुटकर मुंबई : ‘सुरक्षेसाठी आजची रात्र बाहेर काढा, अन्यथा पाऊस जास्त पडला तर काही खरे नाही’, अशी धोक्याची सूचना मालाड पूर्वच्या एसआरए इमारतीमधील रहिवाशांना अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या इमारतीच्या शेजारीच खासगी विकासकाकडून नवीन टॉवरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे अवघ्या दोन वर्षांपूर्वी ताबा मिळलेली सात मजली इमारत कधीही ढासळू शकते. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने ‘घरे रिकामी करा, अथवा मरा’ अशी वेळ स्थानिकांवर आली आहे.मालाड पूर्वच्या कुरार व्हिलेज येथील शिवाजीनगरमध्ये ब्रह्मा विष्णू महेश को-आॅपरेटिव्ह सोसायटी आहे. या सात मजली इमारतीचा ताबा गेल्या दोन वर्षांपूर्वीच रहिवाशांना मिळाला असून एकूण १३९ कुटुंबे या इमारतीत राहतात. स्थानिकांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान त्यांच्या घरी आले आणि इमारतीमधून बाहेर पडा, असे सांगू लागले. पाऊस जास्त पडला तर जीवितहानी होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.या इमारतीच्या शेजारीच एका टॉवरचे काम सुरू असून त्यासाठी चार ते पाच पोकलेन राहतील इतका मोठा खड्डा खणण्यात आला. तो इमारतीच्या अगदी बाजूला असल्याने त्यात माती ढासळत असून संबंधित एसआरए इमारतीचा पाया कमकुवत होत चालला आहे.परिणामी कधीही इमारत ढासळून मोठी जीवितहानी होण्याची भीती स्थनिकांना सतावत असून त्यांची झोप उडाली आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी लक्ष घालत योग्य त्या उपाययोजना करण्याची विनंती रहिवाशांनी केली आहे.दोन वर्षांपूर्वीच मिळाला होता ताबाइमारतीच्या शेजारीच खासगी विकासकाने नवीन टॉवरसाठी खड्डा खोदला आहे. या खड्ड्यामुळे इमारतीचा पाया ढासळू लागला आहे. त्यामुळेच अवघ्या दोन वर्षांपूर्वी ताबा मिळलेली ही सात मजली इमारत कधीही जमीनदोस्त होऊ शकते. मात्र, पर्यायी व्यवस्था नसल्याने जीव मुठीत घेऊन या इमारतीत राहावे लागत असल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली.ब्रह्मा विष्णू महेश को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या इमारतीशेजारीच एका टॉवरचे काम सुरू असून त्यासाठी चार ते पाच पोकलेन राहतील इतका मोठा खड्डा खणण्यात आला. तो इमारतीच्या अगदी बाजूला असल्याने त्यात माती ढासळत असून इमारतीचा पाया कमकुवत होत चालल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.‘भरपावसात जायचे कुठे?’खासगी विकासकाने आमच्या इमारतीशेजारी खड्डा खणला आणि तो तसाच ठेवला. मात्र त्याच्यावर काहीच कारवाई प्रशासनाने केली नाही आणि आता भरपावसात आम्हाला घर रिकामी करण्यास सांगण्यात येत आहे. आम्ही उठून जायचे तरी कुठे? भाडेतत्त्वावर घर लगेच मिळणार कुठे आणि मिळाले तरी त्याचे भाडे परवडणार आहे का? त्यामुळे आता जे होईल ते होईल पण आम्ही घर खाली करून जाणार नाही, असे इमारतीमधील रहिवाशांकडून सांगण्यात आले.