Join us  

पर्यटकांना अनुभवण्यास मिळणार ज्यू पर्यटन स्थळांचे वैभव, पर्यटन विभागाचा उपक्रम

By स्नेहा मोरे | Published: March 08, 2024 6:50 PM

Mumbai News: मुंबईतील ज्यू पर्यटन स्थळांचे वैभव पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने नवा उपक्रम हाती घेतला आहे. राज्याचा पर्यटन विभाग आणि इस्त्रायल वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने ' ज्युविश रुट ' हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मुंबई - मुंबईतील ज्यू पर्यटन स्थळांचे वैभव पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने नवा उपक्रम हाती घेतला आहे. राज्याचा पर्यटन विभाग आणि इस्त्रायल वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने ' ज्युविश रुट ' हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहर उपनगरात वाॅकच्या माध्यमातून पर्यटनाचा उद्देश आहे.

या प्रकल्पात ज्युविश पर्यटन स्थळांमध्ये नेसेट एलियाहू इमारत, काळा घोडा मधील ब्लू सिनेगॉग, डेव्हिड ससून लायब्ररी, छाबाड हाऊस यांचा समावेश आहे. तसेच, चिंचपोकळी आणि वरळी येथील ज्यू स्मशानभूमीचाही समावेश आहे. या प्रकल्पातील ज्यू पर्यटन स्थळांचा संदर्भ जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातील ऐतिहासिक भूगोलचे प्राध्यापक शौल सपिर यांनी लिहिलेल्या बाॅम्बे मुंबई - सिटी हेरिटेज वाॅक , एक्सप्लोरिंग द ज्युविश अर्बन हेरिटेज पुस्तकातून घेण्यात आला आहे. तसेच, या प्रकल्पामध्ये पूर्वी असणाऱ्या पाच पर्यटनाच्या मार्गांत आणखीन दोन मार्गांची भर घालण्यात आली आहे.

मुंबईप्रमाणे पुणे आणि रायगड येथील पर्यटन स्थळांचाही समावेश आहे. लवकरच पर्यटन विभागाकडून या पर्यटन प्रकल्पासाठी अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात येणार आहे, ज्यात या टूर संदर्भात दृकश्राव्य माहितीचा समावेश असेल. मोबाईल-फोन ॲप्लिकेशन विकसित करण्याचे काम ट्रॅव्हल कंपनीकडे सोपवले जाईल. या अॅपच्या माध्यमातून स्कॅनिंगद्वारे पर्यटन स्थळांची माहिती मिळण्याचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या अॅपमधील माहिती इंग्रजी आणि मराठी भाषेत असणार आहेत.

टॅग्स :मुंबई