Join us  

मुंबई पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक इटालियन महिलेवर केला टुर गाईडने बलात्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 2:48 PM

गुन्हा कुलाबा पोलीस ठाण्यातून जुहू पोलीस ठाण्यात केला वर्ग  

मुंबई - मुंबई पाहण्यासाठी पर्यटक म्हणून आलेल्या ३७ वर्षीय महिलेवर टूर गाईडने कॅबमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवी दिल्लीतील इटालियन दूतावासाने पीडित महिलेला सांगितल्याप्रमाणे मुंबईत येवून तिने कुलाबा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र, बलात्काराची घटना जुहू ते कुलाबा प्रवासादरम्यान घडली असल्याने कुलाबा पोलिसांनी हा गुन्हा जुहू पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला आहे. परदेशी नागरिकावर हा अत्याचार झाल्याने वरिष्ठ अधिकारी देखील या गुन्ह्याच्या तपास करत आहेत. हा धक्कादायक प्रकार १४ जूनला घडला होता.अज्ञात टूर गाईडविरोधात भा. दं. वि. कलम ३७६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित परदेशी महिला पर्यटक भारत देश पाहण्यासाठी नोव्हेंबर २०१७ रोजी आली. काहीकाळ बेंगळुरूमध्ये राहिल्यानंतर ती मुंबई पाहण्यासाठी ११ जून २०१८ रोजी आली. पीडित महिलेला दिलेल्या तक्रारीनुसार ती गेट वे येथे पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पोचली तेव्हा तिथे काही खाजगी बसेस मुंबई दर्शनासाठी असल्याचे तिला दिसले. दरम्यान, एक माणूस टुर गाईड असल्याचे सांगत त्या महिलेकडे पोचला. तिने त्याच्याशी बातचीत करून मुंबई दर्शनसाठी बसच्या दोन तिकिटं विकत घेतली. कुलाबा ते जुहू या संबंध मुंबई दर्शनात प्रवासात अज्ञात आरोपी पीडित महिलेसोबत होता. बस जेव्हा जुहू येथे पोचली तेव्हा अज्ञात टुर गाईडने तिला जुहूत राहत असलेल्या अभिनेत्यांची घर पाहण्यास बरेच पर्यटक उत्सूक असल्याचे सांगितले आणि तिने देखील टुर गाईडसोबत बॉलिवूड अभिनेत्यांचे बंगले पाहण्यास संमती दर्शविली. त्यानुसार जवळपास सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ते दोघे निघाले. अभिनेत्यांचे बंगले दाखवल्यानंतर आरोपी टुर गाईडने पीडित परदेशी महिला पर्यटकाला दक्षिण मुंबईत ज्या हॉटेलमध्ये ती राहत होती तिथे सोडतो असे सांगितले. त्यानुसार कॅबने दोघांनी प्रवास सुरु केला. काही अंतर पार केल्यानंतर टुर गाईडने टॅक्सी चालकास बिअर विकत घेण्यासाठी टॅक्सी थांबविण्यास सांगितली. गाईडने दारूच्या दुकानातून बिअर विकत घेतली आणि ती महिलेला पिण्यास जबरदस्ती केली. मात्र, तिने बिअर पिण्यास नकार दिला. त्यानंतर टॅक्सीत माझ्याशी अश्लील चाळे सुरु केले आणि माझे तोंड हाताने दाबून ठेवले जेणेकरून मी मदतीसाठी आरडाओरडा करू नये असे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. तसेच पीडित महिलेचा लैंगिक छळ केला. दरम्यान, महिलेने मोबाईल फोन काढून काही फोटो काढले. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास टॅक्सी दक्षिण मुंबईत पोचली. त्यावेळी गाईडने महिलेला मोबाईलमधील कोणास दाखविलेस तर, त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आरोपी टुर गाईडने इंस्टाग्रामवर महिलेला गाठून तिचा पत्ता मागू लागला. त्यानंतर भीतीपोटी तिने १८ जूनला मुंबई सोडली आणि बेंगळुरू येथील आश्रमात जेथे ती राहत होती तेथे पुन्हा गेली. २६ जूनला तिने नवी दिल्लीत इटालियन दूतावासाच्या कार्यालयात जावून घडला प्रकार सांगितला. कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तिला पुन्हा मुंबईत जावून वकिलाला भेटून गुन्हा दाखल करण्यास सांगितले. ऑनलाईन पीडित महिलेने वकिलाला संपर्क साधला आणि २८ जून रोजी तिने कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा हा जुहू ते कुलाबा या प्रवासादरम्यान घडला असून जुहू पोलीस ठाण्याकडे हा तपास देण्यात आला आहे. सध्या पोलीस मुंबई दर्शनासाठी ज्या बसेस आहेत. तेथे काम करणाऱ्यांची कसून चौकशी करीत आहे. 

टॅग्स :बलात्कारमुंबई