Join us  

‘टॉपर’नेही परीक्षेवर टाकला बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 5:18 AM

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या निकालात घातलेल्या गोंधळाचा फटका विधि अभ्यासक्रमाच्या (एलएलएम) विद्यार्थ्यांना बसला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या निकालात घातलेल्या गोंधळाचा फटका विधि अभ्यासक्रमाच्या (एलएलएम) विद्यार्थ्यांना बसला आहे. १० जानेवारी रोजी विद्यापीठाने प्रवेशाची ५वी यादी जाहीर केली आणि आता २३ जानेवारीपासून परीक्षा सुरू होणार आहे. मात्र, परीक्षा मंडळाने केलेल्या या घाईमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठीदेखील पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती, पण विद्यापीठाने याकडे दुर्लक्ष केल्याने, आता एलएलबी परीक्षेत पहिला आलेल्या पार्श्वा भांखरिया याने एलएलएमच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत गोंधळ झाल्याने निकाल उशिरा लागले. त्यामुळे एलएलएमची प्रवेश प्रक्रिया १० जानेवारीपर्यंत सुरूच होती, पण आता या सत्रातील परीक्षांना उशीर व्हायला नको, म्हणून विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २३ जानेवारीपासून परीक्षा सुरू होतील. परंतु प्रवेश उशिरा झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. याचा विद्यापीठाने विचार करावा, परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, या मागणीसाठी विद्यापीठात एलएलबी अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या पार्श्वानेही एलएलएमच्या परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे आता एलएलएम परीक्षा प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत. मुंबई विद्यापीठ मनमानीपणे एलएलएमच्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.मुंबई विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा प्रकार घडला आहे. विद्यापीठाचा मनमानी कारभार सुरू आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा, म्हणून परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घ्यावी, अशी मागणी केली होती,पण विद्यापीठाने फक्त पाच दिवस परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या मनाशी खेळ केला आहे, असे मत स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी मांडले.मुंबई विद्यापीठ मनमानीपणे एलएलएमच्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र नेमका काय निर्णय घ्यायचा, या संदर्भात या आठवड्यात बैठक घेऊन त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे विद्यार्थी संघटनांनी सांगितले.