Join us  

सासरच्यांकडून टोमणे हे वैवाहिक जीवनात नित्याचे- सत्र न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 1:22 AM

सत्र न्यायालय : सासू-सासऱ्यांची जामिनावर सुटका

मुंबई : सासरच्या मंडळीकडून उपाहासात्मक बोलणी ऐकणे, टोमणे ऐकणे या बाबी विवाहित जीवनात नित्याच्याच आहेत. प्रत्येक कुटुंब याचे साक्षीदार आहे, असे म्हणत सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिक असलेल्या सासू-सासऱ्यांची अटकपूर्व जामिनावर सुटका केली. त्यांच्या सुनेने आपल्याला सासू- सासरे वाईट वागणूक देत असल्याची तक्रार केली होती. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेशन जर्नालिस्टच्या यादीत सासू-सासऱ्यांचे नाव असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचे सुनेने न्यायालयाला सांगितले. मात्र, सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हटले.

३० वर्षीय महिलेने २०१८ मध्ये आपल्या वर्गमित्राशीच विवाह केला. सध्या तिचा पती दुबईत नोकरीनिमित्त आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती हा घरकाम करणाऱ्या महिलेचा मुलगा असून, संबंधित दाम्पत्याने त्याला दत्तक घेतल्याची बाब लग्नाला काही दिवस उरलेले असताना उघडकीस आली. आपल्या लग्नात सासू-सासऱ्यांनी काहीही गिफ्ट दिले नाही. त्यामुळे आपल्या आई-वडिलांनीच दीड कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने लग्नात दिले. सासरचे फ्रिजला हात लावू देत नाहीत. शिळे अन्न खायला घालतात आणि लिव्हिंग रूममध्ये झोपायला सांगतात, असा आरोप महिलेने केला.

माहेरी जाऊ देत नाहीत. याबाबत पतीकडे तक्रार केली असता त्याने आपल्या आई-वडिलांची आज्ञा पाळण्यास सांगितले. दुबईवरून परतताना पतीने १५ किलो सुकामेवा दिला. हा सर्व सुकामेवा सासरी दिला तर त्यांनी तो स्वीकारण्यापूर्वी त्याचे चक्क वजन करून पाहिले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तिच्या सासू आणि पतीकडे तिचे दागिने आहेत, असे महिलेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर सासरच्या मंडळींकडून त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, महिलेला आपल्या पतीला दत्तक घेण्यात आले आहे, याची माहिती होती. विवाहानंतर केवळ १० दिवसच ती सासू-सासऱ्यांबरोबर राहिली. विवाहाचा खर्च दोन्ही बाजूच्या पक्षांनी केला. आरोपींना त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविल्याची कल्पना नव्हती. त्यांची बँक खाती गोठविण्यात आल्यानंतर त्यांना समजले.

 ‘अटक करण्याची आवश्यकता नाही’

महिलेने केलेले आरोप सामान्य आहेत. सासरच्या मंडळीकडून उपाहासात्मक बोलणी ऐकणे, टोमणे ऐकणे या बाबी विवाहित जीवनात नित्याच्याच आहेत. प्रत्येक कुटुंब याचे साक्षीदार आहे. त्यासाठी ८० व ७५ वर्षीय दाम्पत्याला अटक करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत न्यायालयाने सासू व सासऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मान्य केला.

टॅग्स :न्यायालय