Join us  

चार गट, गणांसाठी जिल्हयात आज मतदान

By admin | Published: January 27, 2015 11:25 PM

ठाणे जिल्हा परिषदेच्या चार गटांसह पंचायत समित्यांच्या चार गणांमध्ये बुधवारी निवडणूक होत आहे. शहापूर व मुरबाड तालुक्यातील गटांसह गणांमध्ये

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या चार गटांसह पंचायत समित्यांच्या चार गणांमध्ये बुधवारी निवडणूक होत आहे. शहापूर व मुरबाड तालुक्यातील गटांसह गणांमध्ये हे मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडणाऱ्या परिसरातील कामगारांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसह पाच पंचायत समित्यांच्या ११० गणांमध्ये निवडणूका जाहीर करण्यात आल्या होत्या. पण सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारानी या निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केला आहे. यामुळे उमेदवारी अर्ज न घेतलेल्या शहापूर तालुक्यातील आसनगांव, नडगांव या दोन गटांसह कळंभे या गणात आणि मुरबाड तालुक्यातील शिरवली, नारिवली या दोन गटांसह टोकावडे, शिवळे, देवगाव या तीन गणांसाठी हे मतदान होणार आहे. या चार गटांमध्ये दहा उमेदवार तर चार गणांमधील नऊ उमेदवारांना सुमारे ९३ हजार ६३ मतदार मतदान करणार आहेत. शहापूरचे दोन गट, एका गणासाठी ४५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्यावर सुमारे ३५ हजार १४८ मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात सहा झोन तयार करण्यात आले आहेत. यातील मतदान केंद्रांवर साहित्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी सात बसेस, आठ जीपचा वापर करण्यात आला आहे. तर या तालुक्यातील ४५ मतदार केंद्रांवर सुमारे ३०० अधीक्षकांसह अन्य अधीकारी, कर्मचारी कर्तव्यास तैनात करण्यात आले आहेत.तर मुरबाडच्या दोन गटांसह तीन गणांसाठी ८४ मतदान केंद्र असून त्यावर ५७ हजार ९१४ जणांच्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे सात झोन मध्ये विभागल्या गेलेल्या या निवडणूक कार्यक्षेत्रात ८४ मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी ५१० अधिकारी, कर्मचारी मतदारांना सेवा देणार आहेत. या तालुक्यामध्ये पाच बसेस, आठ मिनी बसेस, नऊ जीप आदी वाहनांचा वापर करण्यात येत आहे