Join us

आजची मुले पालकांपेक्षा हुशार

By admin | Updated: July 30, 2015 23:30 IST

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून आजची पिढी ही पालकांपेक्षा निश्चितच हुशार आहे. त्यांच्यात मल्टिटास्किंग काम करण्याची क्षमता आहे. मुलांचे यश परीक्षेतील गुणांवर अवलंबून

पनवेल : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून आजची पिढी ही पालकांपेक्षा निश्चितच हुशार आहे. त्यांच्यात मल्टिटास्किंग काम करण्याची क्षमता आहे. मुलांचे यश परीक्षेतील गुणांवर अवलंबून नसून त्यांच्या अंगभूत कौशल्यावर अवलंबून असल्याने आपल्या मुलाचा कल कोणत्या विषयात, कोणत्या क्षेत्रात आहे, हे ओळखूनच त्याला शिक्षण द्यावे, असा सल्ला ‘शुअरविन हार्ट टू हार्ट फॅमिली कौन्सिलिंग सेंटर’चे समुपदेशक चंद्रकांत पागे यांनी दिला. लोकमत आणि पनवेल नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित ‘मुलांच्या समस्या, पालकत्वाला आव्हान’ या कार्यक्रमात ते बोलत होते. पनवेलसह कामोठे, नवी मुंबईतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्र माचे उद्घाटन पनवेलच्या नगराध्यक्षा चारु शीला घरत यांनी हस्ते करण्यात आले. त्यानंतर देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुलांमधे वाढणारा चिडचिडेपणा, धांदरटपणा, उध्दटपणामुळे हल्ली पालक चिंतेत असतात. मात्र यामागची कारणे समजून घेण्याचा सल्ला पागे यांनी पालकांना दिला. सततची स्पर्धा, अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुलांमधील आत्मविश्वास डळमळीत होत आहे. त्यांचे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य बिघडत आहे, त्यांच्यात एकाकीपणा, नैराश्याची भावना वाढत असून मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये, असा सल्ला देत पागे यांनी गुुरुकुल शिक्षण पध्दतीचे महत्त्व विशद केले. मुलांना योग्य प्रेम आणि आदरयुक्त धाक आवश्यक आहे. यावेळी पालकत्वाची संकल्पना स्पष्ट करताना पागे यांनी, अतिधाकामुळे मुले एकाकी होतात. त्यांच्या कामाची, अभ्यासातील प्रगतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मुलांची कधीही तुलना करू नये, त्यांना विनाकारण धमक्या, मारझोड करू नये, त्यांच्याविषयी परस्पर निष्कर्ष काढू नये, याबाबत विश्लेषण करताच उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.आजच्या शिक्षण पध्दतीतून विद्यार्थ्यांना वळण लागत नसून त्यांचे केवळ दळण होत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केवळ परीक्षार्थी घडवले जात असून माणूस घडविण्याचे शिक्षण देण्याची जबाबदारी पालक, शिक्षकांवर आहे. टीव्ही, कॉम्प्युटर गेम, व्हिडिओ गेमच्या आहारी गेल्याने मुलांमध्ये भावनाशून्यता, अनैतिकता, लैंगिक समस्या वाढत आहे. या गोष्टींवर मात करण्यासाठी पालकांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला पागे यांनी अखेरीस दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले. कार्यक्रमाला दिग्दर्शक विनोद सावंत, लोकमत मुंबईचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्पर्धात्मक युगामुळे मुलांवरील ताण वाढत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक - मानसिकतेवर होत आहे. लोकमतने आजच्या कार्यक्रमातून पालक - पाल्यात चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, तो कौतुकास्पद आहे. - चारु शीला घरत, नगराध्यक्षा, पनवेलमुलांचे संगोपन करताना सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र त्यांच्या मानसिकतेचा विचार करून पालकांनी आपल्या विचारात-वर्तनात कसा बदल करावा, याबाबत या कार्यक्रमातून योग्य मार्गदर्शन मिळाले. - रु पाली घाटगे, पालक , नेरूळ चंद्रकांत पागे यांनी पालकांनाच नव्हे तर विद्यार्थ्यांनाही पालकांचे महत्त्व पटवून दिले आहे. आई-वडिलांच्या ऋणातून कुणीही, कधीही मुक्त होऊ शकत नाही. त्यांचा आदर- सन्मान करावा, त्यांची काळजी घ्यावी, सरांचे हे विचार आम्ही नेहमीच लक्षात ठेवू. - स्नेहल खंदारे, विद्यार्थिनी