Join us  

आज मध्य रेल्वेच्या पाच स्थानकांवर ‘मॉकड्रिल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:39 AM

रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी आणि आगामी पावसाळ्यासाठी गर्दी व्यवस्थापन यासाठी हे मॉकड्रिल राबविण्यात येत आहे.

मुंबई : स्थानकांतील वाढती गर्दी लक्षात घेत, मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने, मध्य रेल्वेवर गर्दी नियोजनाचे मॉकड्रिल करण्यात येणार आहे. बुधवारी गर्दीची वेळ संपल्यानंतर ११ ते १ या वाजेपर्यंत कुर्ला, दादर, परळ, करी रोड आणि चिंचपोकळी या स्थानकांवर हे मॉकड्रिल करण्यात येईल.प्रवासी गर्दीच्या नियोजनासाठी आरपीएफच्या जवान हे मॉकड्रिल करणार आहे. मॉकड्रिलसाठी स्थानकात प्रवेश करण्याची आणि बाहेर पडण्याची जागा, पादचारी पुलांवरील गर्दी, या जागांसह अन्य जागांवर हे मॉकड्रिल पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात दादर ते चिंचपोकळी या स्थानकांवर मॉकड्रिल होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात कुर्ला स्थानकात मॉकड्रिल करण्यात येणार आहे.रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी आणि आगामी पावसाळ्यासाठी गर्दी व्यवस्थापन यासाठी हे मॉकड्रिल राबविण्यात येत आहे. आरपीएफ आणि मध्य रेल्वे (वाणिज्य विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने हे मॉकड्रिल होईल. याचबरोबर नाशिक येथील कुंभमेळ्याचे व्यवस्थापन करणारे आयपीएस अधिकारी रवींद्र सिंगल यांना गर्दी नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मध्य रेल्वेने बोलावले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक विद्याधर मालेगावकर यांनी दिली.

टॅग्स :मध्य रेल्वे