Join us  

आजपासून हार्बर गोरेगावपर्यंत धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 5:08 AM

मोठ्या प्रतीक्षेनंतर हार्बर लोकलच्या गोरेगावपर्यंतच्या प्रवासाला गुरुवारी सुरुवात होणार आहे.

मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर हार्बर लोकलच्या गोरेगावपर्यंतच्या प्रवासाला गुरुवारी सुरुवात होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकावर सायंकाळी ७ वाजता हार्बर लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. तसेच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर सरकते जिने, पादचारी पूल या प्रवाशी सुविधांचेही लोकार्पण होणार आहे.डिसेंबर २०१७मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई शहर परिवहन प्रकल्प (एमयूटीपी-२) अंतर्गत हार्बर विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले होते. लोकलची अनेकदा या मार्गावर चाचणी झाली. पण अडचणींमुळे प्रत्यक्ष लोकल धावण्यास विलंब झाला. हार्बर विस्तारीकरणामुळे दादर आणि अंधेरी स्थानकांवरील गर्दी विभागली जाईल. अंधेरीपर्यंतच्या ४९ फेऱ्यांचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.तसेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, डॉकयार्ड रोड, ठाणे, लोणावळा येथे प्रत्येकी दोन सरकते जिने आणि लिफ्ट यांचे लोकार्पण करण्यात येईल. सुट्ट्यांचा काळ लक्षात घेता नेरळ-माथेरान मार्गावर टॉयट्रेनच्या फेºयादेखील वाढविण्यात येणार आहेत.गोरेगाव हार्बर लोकलच्या लोकार्पण प्रसंगी सेना-भाजपाच्या शक्तिप्रदर्शनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मार्गावर हार्बर रेल्वे सुरू होत नसल्यामुळे गोरेगावकरांमध्ये नाराजी होती. अखेर याला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र विस्तारीकरणाच्या श्रेयवादामुळे पुन्हा एकदा सेना-भाजपा आमनेसामने येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राम मंदिर स्थानकातील पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सज्ज असल्याची माहितीदेखील समोर येत आहे.प्रभादेवी नामफलकाचा विसरएल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामांतर ‘प्रभादेवी’ करण्याची प्रक्रिया कागदोपत्री पूर्ण झालेली आहे. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी झालेली नाही. पश्चिम रेल्वेने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत हार्बर गोरेगार विस्तारासह सर्व लोकार्पण करण्यात येणाºया सुविधांचा उल्लेख केला आहे. मात्र अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एल्फिन्स्टन रोडच्या प्रभादेवी नामांतराचा विसर पडल्याचे दिसून आले. यामुळे अद्यापही ‘प्रभादेवी’साठी मुहूर्त मिळत नसल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात रंगत आहे. 

‘प्रॉमिस फुलफिल, गूड न्यूज फॉर गोरेगावकर’ असा मथळा देऊन महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे चिरंजीव व भाजपा वॉर्ड क्रमांक ५०चे नगरसेवक दीपक ठाकूर यांनी सोशल मीडियावरून या उद्घाटनाचे निमंत्रण पाठवले आहे. तर शिवसेनेने श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाची बॅनरबाजीदेखील केली आहे.गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वेचा विस्तार करावा यासाठी गेली अनेक वर्षे मी व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रयत्न केले. हे गोरेगावकरांना ठाऊक आहे. आपण खासदार म्हणून या विस्तारीकरणासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देणारे विशेष हँडबिल तयार केल्याची माहिती खा. कीर्तिकर यांनी दिली. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री राम नाईक व विद्या ठाकूर यांनी यासाठी किती प्रयत्न केले हे तमाम गोरेगावकर जाणतात, असा टोला दीपक ठाकूर यांनी लगावला.